माझं शोषण होत आहे, kangana Ranaut ने व्हिडिओ केला शेअर
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने बहिण रंगोलीसोबत आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने बहिण रंगोलीसोबत आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. गेल्या वर्षी त्यांच्यावर समाजात द्वेष पसरवल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर कोर्टाने वांद्रे पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी कंगना रानौत आणि रांगोली यांना पोलीस ठाण्यात येऊन त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी समन्स पाठविला होता. परंतु त्या हजर झाल्या नव्हत्या.
मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीला दोनदा समन्स बजावले होते. त्याचवेळी अभिनेत्रीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती आणि तिच्या व रंगोलीविरोधातील एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती, परंतु हायकोर्टाने तिची याचिका मान्य केली नाही आणि 8 जानेवारी रोजी दुपारी 12 ते दुपारी 2 दरम्यान वांद्रे पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी सांगितले होते.
कंगनाने बहिणीसोबत वांद्रे पोलीस ठाण्यात शुक्रवारी हजेरी लावली. पोलीस स्टेशन गाठण्यापूर्वी कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, त्यांचे शोषण केले जात आहे आणि त्रास दिला जात आहे. व्हिडिओमध्ये कंगना म्हणाली, 'जेव्हापासून मी देशाच्या हिताबद्दल बोलले तेव्हापासून माझ्यावर अत्याचार होत आहेत, माझे शोषण केले जात आहे. हे संपूर्ण देश पहात आहे. माझे घर बेकायदेशीरपणे तोडले गेले. शेतकर्यांच्या हितासाठी बोलण्यावर ही माझ्यावर केसेस टाकण्यात आल्या. अगदी माझ्यावर हसण्यासाठी देखील केस दाखल केली गेली.'
अभिनेत्रीने व्हिडिओत पुढे म्हटले आहे की, 'माझी बहीण रंगोली जीने कोरोनाच्या सुरूवातीस डॉक्टरांवरील अत्याचाराविरूद्ध आवाज उठविला होता. त्या वेळी देखील माझं नाव त्या प्रकरणात गंतवण्यात आलं. परंतु न्यायाधीशांनी ते रद्द केले. मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावायला सांगण्यात आली आहे. ही कोणत्या प्रकारची हजेरी आहे. हे कोणी मला सांगत नाही. माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल कोणालाही सांगायचं नाही. असं ही मला सांगण्यात आलं.'