`वडिलांना कंटाळलो, घरात 3 बहिणी...`: एकदा रेल्वे ट्रॅकवर आयुष्य संपवायला निघालेले जॉनी लिव्हर
Johnny Lever : जॉनी लिव्हर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या स्ट्रगलच्या काळातील आणि का आयुष्य संपवायला निघाले होते. याविषयी सांगितलं होतं.
Johnny Lever Struggle Story: बॉलिवूड अभिनेता जॉनी लिव्हर यांचं नाव दिग्गज कॉमेडीयन कलाकारांसोबत घेण्यात येतं. त्यांचं नाव घेतलं तरी अनेकांना लगेच त्यांचे विनोद आठवतात आणि ते हसू लागतात. जॉनी लिव्हर यांनी 1980 मध्ये ग्लॅमरच्या जगात पदार्पण केलं आणि ते आजही त्यांच्या कलेनं प्रेक्षकांची मने जिंकतात. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. करिअर चांगलं सुरु असताना जॉनी लिव्हर यांनी त्यांच्या आयुष्यात वाईट काळ पाहिला. ज्याविषयी त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
जॉनी लिव्हर यांनी ही मुलाखत यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाच्या 'टीआरएस' शोमध्ये हजेरी लावली होती. जॉनी लिव्हर यांनी त्यांच्या करिअरविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. या आधी जॉनी लिव्हर यांनी त्यांच्या आयुष्याविषयी खूप कमी गोष्टी सांगितल्या आहेत. मात्र, आता दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील त्या वाईट काळाविषयी सांगितलं आहे. जॉनी यांनी खुलासा केला की त्यांचं बालपण हे फार अंधारात गेलं. याचा अर्थ त्यांची फार बिकट परिस्थिती होती. त्यांनी सांगितलं की जेव्हा ते काही पैसे कमावायचे तेव्हाच त्यांना खायला मिळायचं.
बालपणाच्या त्या गोष्टी आठवत जॉनी म्हणाले, 'लहाणपणी खूप बिकट परिस्थिती होती. लहाणपणापासून मला कुटुंबाला सांभाळावं लागत होतं. तेव्हा मी खूप संघर्ष केलं. मी काम केलं तरंच घरी जेवण बनायचं. वडील होते मात्र, त्यांना कळतंच नव्हतं की ते काय करत आहेत, ते त्यांच्या मित्रांसोबत निघायचे आणि कामावर पण जायचे नाही. दादागिरी करायचे. आम्हाला नेहमी भीती वाटायची की आमचे वडील जिवंत परतणार नाही.'
हेही वाचा : अभिनेत्री राणीचा सोशल मीडियाला रामराम! 'या' सवयीला कंटाळून घेतला निर्णय
पुढे जॉनी लिव्हर यांनी सांगितलं की जेव्हा ते 13 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला होता. त्यांना त्यांच्या वडिलांचा इतका कंटाळ आला होता की त्यांनी रेल्वे ट्रॅकवर झोपून स्वत:चा जीव देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ते रेल्वे ट्रॅकवर गेले देखील, जेव्हा ट्रेन जवळ येऊ लागली तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर तीन बहिणींचे चेहरे येऊ लागले होते आणि त्यांनी लगेच तिथून जाण्याचा निर्णय घेतला. कारण मला काही झालं तर त्यांची काळजी कोणं घेईल असा प्रश्न जॉनी यांना सतावू लागला होता.