अभिनय बेर्डे `या` तारखेला करणार रंगभूमीवर पदार्पण, नाटकाचे नावही ठरले
अभिनय बेर्डेचं हे नाटक आजच्या तरुण पिढीच्या आणि त्यांच्या पालकांशी निगडित विषयावर असणार आहे.
Abhinay Berde Aajibai Jorat Drama Relese Date : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. अभिनयचा ‘ती सध्या काय करते’ हा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर तो ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘रंपाट’, ‘बॉईज 4’ अशा अनेक चित्रपटात झळकला. यानंतर आता लवकरच तो व्यावसायिक रंगभूमीवर झळकणार आहे. ‘आज्जीबाई जोरात’ असे अभिनय बेर्डेच्या पहिल्या नाटकाचे नाव आहे. आता हे नाटक रंगभूमीवर कधी येणार, याची तारीख जाहीर झाली आहे.
येत्या 30 एप्रिलला रंगभूमीवर पहिला प्रयोग
जिगीषा-अष्टविनायक निर्मित आणि क्षितिज पटवर्धन यांच्या लेखन-दिग्दर्शनातून साकारलेलं ‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय बेर्डेचं हे नाटक आजच्या तरुण पिढीच्या आणि त्यांच्या पालकांशी निगडित विषयावर असणार आहे. विनोदी फँटसी असणारं पहिलं वहिलं AI महाबालनाट्य येत्या 30 एप्रिलला रंगभूमीवर दाखल होत आहे.
अभिनय बेर्डेचे प्रथमच रंगभूमीवर पदार्पण
लहानांसोबत मोठ्यांनाही हसवणारं 'आज्जीबाई जोरात' या नाटकात अनेक दिग्गज कलाकार एकत्र येणार आहेत. यात रंगभूमीवर राज्य करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत 'आज्जीबाई जोरात' मध्ये धमाल उडवायला सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे अभिनय बेर्डे या नाटकाद्वारे प्रथमच रंगभूमीवर पदार्पण करत आहे. यासोबतच पुष्कर श्रोत्री, मुग्धा गोडबोले, जयवंत वाडकर यांसारख्या अनुभवी कलाकारांची तगडी फौज देखील या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आणखी वाचा : लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाची नवी इनिंग, म्हणाला 'आई-बाबांच्या आशीर्वादानं...'
अभिनय बेर्डेने याबद्दल काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने 'तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमानं आणि आई-बाबांच्या आशीर्वादानं आज नाट्यविश्वात पहिलं पाऊल टाकतोय! ‘आज्जीबाई जोरात!’ हे माझं पहिलं व्यावसायिक मराठी नाटक आहे. सध्या आमच्या तालमी जोरदार सुरू असून महिनाखेरीस आम्ही मायबाप रसिकांच्या भेटीस येतोय’ असे म्हटले होते. ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन क्षितिज पटवर्धन याने केले आहे. या नाटकात एकूण 8 कलाकार आणि 11 नर्तक असणार आहेत.