स्त्री वेशात झळकणाऱ्या `या` विनोदी अभिनेत्याला ओळखलात का?
यावेळी त्याने `देवयानी, पसंत आहे मुलगी?` असे म्हटले आहे. त्याबरोबरच त्याने हार्ट इमोजीही शेअर केला आहे.
Prithvik Pratap Female Character : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला ओळखले जाते. हा कार्यक्रम कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील घराघरात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. गौरव मोरे, ओंकार राऊत, वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब यांसारख्या अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. आता याच कार्यक्रमातील एका अभिनेत्याने स्त्री वेशातील फोटो पोस्ट केला आहे.
फोटोंनी वेधलं सर्वांचेच लक्ष
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात अनेक कलाकार हे विविध भूमिका साकारताना दिसतात. यातीलच एका अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर स्त्री वेशातील फोटो पोस्ट केले आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून विनोदवीर पृथ्वीक प्रताप आहे. पृथ्वीकचे इन्स्टाग्रामवर या फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
पृथ्वीकने शेअर केलेल्या या फोटोत त्याने जांभळ्या रंगाची पोलका डॉट असलेली साडी परिधान केली आहे. त्याबरोबरच त्याने त्याला मॅचिंग कानातले आणि नेकलेसही परिधान केला आहे. यावेळी त्याने केसांना वीग लावला आहे. विशेष म्हणून पृथ्वीकने या फोटोला हुबेहुब मुलींसारखा मेकअप केला आहे. यातील एका फोटोत तो लाजतानाही दिसत आहे.
शिवाली परबची कमेंट
पृथ्वीकने या फोटोला हटके कॅप्शन दिले आहे. यावेळी त्याने 'देवयानी, पसंत आहे मुलगी?' असे म्हटले आहे. त्याबरोबरच त्याने हार्ट इमोजीही शेअर केला आहे. पृथ्वीकच्या या फोटोवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेत्री शिवाली परबने यावर हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
तर काही चाहते यावर विविध कमेंट करताना दिसत आहेत. यात एकाने 'प्रभाकर मोरे यांची शालू', असे म्हटले आहे. तर एकाने 'लयच खतरनाक एकदम' अशी कमेंट केली आहे. तसेच एकाने 'निखळ सौंदर्य' अशी प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीकचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान सध्या पृथ्वीक हा त्याच्या 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहसिन खान यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडेपाटील हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. पृथ्वीकचा हा पहिलाच चित्रपट आहे.