Kiran Mane Post Rohit Pawat Ed : बारामती अॅग्रो कारखान्यात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांची ईडीकडून तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर रोहित पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी मी कोणत्याही कारवाईला घाबरलेलो नाही, ही लढाई संपलेली नसून अशीच सुरू राहणार असल्याचे सांगितले. आता याबद्दल अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी हातात शिवबंधन बांधत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. सध्या ते राजकारणात त्यांचे नशीब आजमावताना दिसत आहेत. आता किरण माने यांनी रोहित पवारांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी रोहित पवारांच्या ईडी चौकशीचा एक किस्सा सांगितला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. 


किरण माने यांची पोस्ट 


"ईडीची धाड पडल्याची बातमी आल्या-आल्या रोहितदादांना मी फोन केला होता. दुपारचे दोन वगैरे वाजले असतील. रिंग झाली पण उचलला नाही. सहसा असं होत नाही. म्हटलं, नक्की त्या ईडीच्या चौकशीत असतील... त्या दिवशी संध्याकाळी माझ्या सासुरवाडीला धामणेरला एक कौटुंबिक कार्यक्रम होता तिकडे गेलो. सगळ्या पाहुण्यांच्या गराड्यात असताना फोन वाजला. स्क्रीनवर नांव बघतोय तर रोहितदादा ! "बोला किरणजी. तुमचा मिसकाॅल दिसला." मी अत्यंत कळकळीनं दादांना म्हणालो, "हे बघा दादा. ईडी येऊद्या, सीबीआय येऊद्या नायतर ते रंगाबिल्ला घरात येऊद्या... तुम्ही लाचार झालेले आम्हाला चालणार नाही. तुरूंग तर तुरूंग. आम्ही रस्त्यावर उतरून लढू तुमच्यासाठी. पण तुम्ही कसल्याही परिस्थितीत त्या भिकारचोटांच्या वळचणीला जाऊ नका."


रोहीतदादा हसले, "किरणजी, अजिबात चिंता करू नका. निर्धास्त रहा. मी हलत नाही." आजपर्यंत सगळी चौकशी, जप्ती वगैरेंचा मनस्ताप सहन करून हा वाघ ताठ कण्यानं उभा आहे. मिटींग्ज घेतोय. सभा गाजवतोय. तिकीटं वाटपाच्या निर्णयात अधिकारवाणीनं मतं मांडतोय. देणारा हात आहे, तो कुणापुढं पसरणारा झालेला नाही ! गड्याहो, आयुष्यात हा स्वाभिमान महत्त्वाचा. रोहितदादा, तुम्ही तो जपलात. आम्हाला तुमचा अभिमान आहे. आता लढायचं, झुंजायचं आणि जिंकायचं. बास. जय शिवराय... जय भीम", असे किरण माने यांनी म्हटले आहे. 



दरम्यान किरण माने यांच्या माढा मतदारसंघातील एका भाषणाचीही सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार निशाणा साधला. "2014 साली जेव्हा मोदी सरकार आलं तेव्हा खरंच मलाही खूप आनंद झाला होता. मी सुद्धा तोपर्यंत काँग्रेसविरोधक झालो होतो. मलाही वाटत होतं की खूप भ्रष्टाचार होतोय, अण्णांचं आंदोलन झालं होतं, त्याचा परिणाम होता. नाही नाही, आता मोदी आले पाहिजेत, अच्छे दिन येणार असं वाटायला लागलं. शंभर दिवसात काळा पैसा परत आणणार, असं ते म्हणाले होते. प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख येणार असंही ते म्हणाले होते. म्हटलं काही नाही झालं तरी चालेल, एक पायरी जरी आपण आता आहोत, त्यापेक्षा वर गेलो तरी बस्स....आज दहा वर्षांनंतर कळतंय, एक पायरी वर जाणं दूर, आपण हजारो पायऱ्या खाली गेलोय. स्वातंत्र्यानंतरच्या सगळ्या भयानक परिस्थिती आपण आहोत." असे किरण माने यांनी म्हटले आहे.