Zee Chitra Gaurav Puraskar 2024 : झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे शर्वरी कुलकर्णी. तिने या मालिकेत दीपूच्या बहिणीची भूमिका साकारली होती. नुकतंच शर्वरीला 'झी नाट्य गौरव 2024' या पुरस्कार सोहळ्यात दोन नामांकनं मिळाली आहेत. त्यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शर्वरी कुलकर्णीला 'झी नाट्य गौरव 2024' या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या श्रेणीत दोन नामांकनं जाहीर झाली आहेत. ही दोन्हीही नामांकन तिला दोन वेगवेगळ्या नाटकांसाठी झाले आहेत. यातील  पहिलं नामांकने हे 'जन्मवारी' या नाटकासाठी असून दुसरे 'डबल लाईफ' नाटकासाठी आहे. या निमित्ताने शर्वरीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने झी गौरव पुरस्काराचे काही फोटोही शेअर केले आहेत. 


शर्वरी कुलकर्णीला 'झी नाट्य गौरव 2024' या पुरस्कार सोहळ्यात 2 नामांकन


"झी नाट्य गौरव २०२४, एकाच वर्षी एकाच category मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून २ नामांकनं मिळाली. दोन्ही नामांकनं दोन वेगळ्या नाटकांसाठी. एक ‘जन्मवारी’साठी आणि एक ‘डबल लाईफ’साठी. ह्या दोन्ही नाटकातल्या माझ्या भूमिका, त्यांचा स्वभाव, काळ, नाटकाचा विषय सगळंच वेगळं. जन्मवारीतली ‘कान्होपात्रा’ बाहेरून स्वतःच्या आत जात अंतर्मनाचा ठाव घेत ५०० वर्ष जुन्या काळात नेणारी, तर डबल लाईफमधली ‘नताशा’ विनोदाच्या अंगाने बदलत्या काळाबरोबर जुन्या-नव्याचा समतोल साधत हसत-हसवत वर्तमान जगणारी. दोघी इतक्या वेगळ्या, पण तरी माझ्याच, माझ्यातल्याच.


संहितेतल्या पात्राला शब्द असतात, विचार असतात, पण चेहरा, शरीर, आवाज मात्र आपला असतो,कलाकाराचा. लेखकाने लिहिलेल्या अरूप पात्राला रंग,आकार, आणि नाद ह्यांमुळे रूप प्राप्त होतं, तेव्हा त्याला ‘भूमिका’ म्हणत असावेत. भूमिका कुठलीही असो, त्यात कलाकाराचा मूळ अंश असतोच,डोकावतोच. ‘नताशा’ असो किंवा ‘कान्होपात्रा’ दोन्ही भूमिकांमध्ये ‘शर्वरी’चा अंश आहेच. म्हणूनच दोघी इतक्या वेगळ्या, पण माझ्याच, माझ्यातल्याच", असे शर्वरी कुलकर्णीने म्हटले आहे. 



याआधीही शर्वरीने तिला या पुरस्कार सोहळ्यात मिळालेल्या नामांकनाबद्दल पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी तिने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान शर्वरी कुलकर्णीने झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ती सोनी मराठीवरील 'आनंदी हे जग सारे' या मालिकेत झळकली. तसेच तिने रंगभूमीवरही काम केले आहे. शर्वरी 'जन्मवारी', 'डबल लाईफ' या दोन मराठी नाटकात सध्या झळकत आहे.