मुंबई: हरहुन्नरी अभिनय आणि वैशिष्टपूर्ण संवादफेकीच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्करोगाने आजारी असल्यामुळे रमेश भाटकर बऱ्याच काळापासून मराठी चित्रपट आणि मालिकांपासून दूर होते. मात्र, नुकत्याच येऊन गेलेल्या 'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटातील भूमिका चाहत्यांसाठी त्यांचे रुपेरी पडद्यावरील शेवटचे दर्शन ठरले. या चित्रपटात रमेश भाटकर यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली होती. या लहानशा भूमिकेतूनही त्यांनी आपली छाप पाडली होती. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

 रमेश भाटकर यांनी मराठी रंगभूमीवरून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.  ‘अश्रूंची झाली फूले’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘अखेर तू येशीलच’, ‘राहू केतू’, ‘मुक्ता’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. यानंतर १९७७ मध्ये 
 ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 'अष्टविनायक', 'दुनिया करी सलाम', 'आपली माणसं' या लोकप्रिय चित्रपटांसह त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले होते. याशिवाय, 'कमांडर', 'हॅलो इन्स्पेक्टर', 'दामिनी', 'बंदिनी', 'युगंधरा' या कार्यक्रमांनी त्यांना छोट्या पडद्यावरही प्रसिद्धी मिळवून दिली.


गेल्याच वर्षी ९८ व्या नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वीच ते 'तू तिथे मी' आणि 'माझे पती सौभाग्यवती' या मालिकांमध्ये दिसले होते.