मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत दरवर्षी कोणत्या ना कोणत्या गाण्याची चर्चा होत असते. तसंच यंदा नव्या वर्षात 'माझ्या दादाचं लगीन' हे गाणं धुमाकुळ घालायला तयार झालंय. उत्तुंग ठाकूर निर्मित 'विकून टाक' या चित्रपटातलं हे धमाकेदार गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आणि लगेचच लोक या गाण्यावर थिरकायला लागलेत. ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटात ग्रामीण भागातील एक गंभीर विषय अत्यंत विनोदी पद्धतीने हाताळण्यात आलाय. समीर पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातलं हे धम्माल गाणं लिहिलंय गुरू ठाकूर यांनी आणि अमितराज यांनी ते संगीतबद्ध केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नघर म्हणजे एक एबस्ट्रक्ट गोंधळ असतो. त्यात हळदीच्या वेळी तर हा गोंधळ शिगेला पोहोचलेला असतो. नाचगाणं, धमाल या गोष्टी घडतातच. त्यात शहरापेक्षा खेड्यात तर लग्नघरची मजा वेगळीच असते. नेमक्या याच पार्श्वभूमीवर हे गाणं आहे. नंदेश उमप यांच्या खड्या आवाजातल्या या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन वृषाली चव्हाण यांनी केलंय.


या गाण्याची जन्मकथाही गाण्यासारखीच धमाल आहे. संगीतकार अमितराज यांनी ही जन्मकथा उलगडली. ते म्हणाले, "आम्हाला एक हळदीचं गाणं बनवायचं होतं. पण अनेक दिवस विचार करूनही काही नवीन जमत नव्हतं. आपल्याकडे लोकसंगीतात हळदीची खूप गाणी आहेत. त्याच्यापेक्षा काहीतरी हटके हवं होतं. असंच एक दिवस आमच्या टीममधला एक सहकारी 'भावाचं लगीन' आहे असं सांगून लवकर निघाला. तो गेला आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे चमकून बघितलं. लग्नघरात अनेक नातलग जमलेले असतात. मग आपण प्रत्येक नात्याचा वापर करून गाण्याची जुळवाजुळव केली तर, असा विचार डोक्यात आला. गुरू ठाकूरने हा विचार पुढे नेला आणि हे गाणं तयार झालं."



हे गाणं गाताना पाय आपोआप ठेका धरत होते. गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी आम्हालाच एवढी मजा आली, म्हणजे लोकांना हे गाणं नक्कीच नाचवणार, याची खात्री आहे, असं गायक नंदेश उमप यांनी सांगितलं. 


विवा इनएन प्रॉडक्शन आणि उत्तुंग ठाकूर निर्मित 'विकून टाक' या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता चंकी पाण्डे मराठीत पदार्पण करत आहे. त्याशिवाय शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषिकेश जोशी, वर्षा दांदळे आणि जयवंत वाडकर हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असतील. या चित्रपटातलं 'माझ्या दादाचं लगीन' हे गाणं प्रेक्षकांना थिरकायला लावत आहेच, पण आता ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला हा चित्रपटही भेटीला येत आहे.