#MeToo मोहीमेला पाठिंबा देण्यासाठी आमिर खानने घेतला `हा` मोठा निर्णय
#MeToo या मोहीमेमुळे लैंगिक शोषणाच्या अनेक धक्कादायक कहाण्या समोर येत आहेत.
मुंबई: सध्या देशभरात गाजत असलेल्या #MeToo मोहीमेच्या पार्श्वभूमीवर अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी एक महत्त्वपूर्ण व्यवसायिक निर्णय घेतला आहे. आमिरने ट्विटरवरून या निर्णयाची माहिती सर्वांना दिली. त्यानुसार आमिर खान भविष्यात लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीबरोबर चित्रपट करणार नाही.
आमिरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लैंगिक गैरवर्तन आणि कोणत्याही प्रकारचे शोषण खपवून न घेण्याचे धोरण आमिर खान प्रॉडक्शन हाऊसने नेहमीच अवलंबिले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून #MeToo या मोहीमेमुळे लैंगिक शोषणाच्या अनेक धक्कादायक कहाण्या समोर येत आहेत. त्यावेळी आम्हीदेखील लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या काही लोकांसोबत काम करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. अधिक चौकशी केली असता संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे समजले. त्यामुळे आम्ही संबंधित व्यक्तीसोबत काम न करण्याच निर्णय घेतल्याचे आमिरने सांगितले.
अधिक वाचा : लैंगिक छळ हा शारीरिक, मानसिक आणि शाब्दिकही... हे तुम्हाला माहीत आहे का?
आमिर खान सध्या यशराज बॅनरचा चित्रपट 'ठग्स ऑफ़ हिंदोस्तान'च्या प्रदर्शनाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. दिवाळीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामध्ये अमिताभ बच्चन, कतरीना कैफ आणि फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत आहेत.