बॉडीगार्डनं दिव्यांग चाहत्यासोबत केलेली वागणूक भोवली! नागार्जुनला मागावी लागली माफी
Nagarjuna Apologise Aiport Video : नागार्जुनच्या बॉडीगार्डनं केलेल्या कृतीची अभिनेत्याला मागावी लागली माफी...
Nagarjuna Apologise Aiport Video : आपले आवडते सेलिब्रिटी हे दिसले की त्यांच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी सगळे लगेच धावतात. मुळात ही क्रेझ आताची नाही तर आधीपासून आहे. अनेकदा सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांसोबत फोटो काढतात तर काही वेळा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. तर अनेकदा सेलिब्रिटींना काही हरकत नसली तरी त्यांचे बॉडीगार्ड पुढे येऊन असं काही करतात की त्याची चर्चा सुरु होती किंवा त्यांना त्यामुळे ट्रोल करण्यात येतं. अशात अनेक चाहते त्यांना आलेले अनुभव सांगताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एक व्हिडीओला पाहता नेटकऱ्यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नागार्जुननं या प्रकरणात माफी मागितली आहे.
नागार्जुनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं त्याच्या आधीच्या ट्विटर म्हणजेच आताच्या X अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं की माणूसकी कुठे गेली? हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी नागार्जुन आणि त्याच्या बॉडीगार्डला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
नागार्जुननं मागितली माफी!
नागार्जुनचा हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ मुंबई विमानतळावरील आहे. काल नागार्जुन आणि धनुष हे दोघे मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. ते दोघे बाहेर येत असताना एक दिव्यांग वृद्ध व्यक्तीनं नागार्जुनला भेटण्यासाठी त्याला स्पर्श केला. नागार्जुन काही प्रतिक्रिया देणार तितक्यात नागार्जुनच्या बॉडीगार्डनं त्या व्यक्तीला बाहेरत्या बाजूला जोरात खेचले आणि दूर ढकलले. या सगळ्यात त्या वृद्ध व्यक्तीचा तोल गेला आणि ते मागे पडता पडता वाचले. मात्र, या सगळ्या विषयी नागार्जुनला काहीही कल्पना नव्हती. दुसरीकडे नागार्जुनच्या मागे असलेल्या धनुषनं हे सगळं पाहिलं त्यानं लगेच त्यांच्याकडे मागे वळून पाहिलं. दुसरीकडे नेटकरी नागार्जुनला ट्रोल करु लागले. घडलेला प्रकार पाहता नागार्जुननं माफी मागितली आहे.
हेही वाचा : VIDEO : संस्कारच ते...! सोनाक्षी- झहीरच्या लग्नात अदिती राव हैदरीच्या होणाऱ्या पतीनं असं काय केलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत नागार्जुन म्हणाला, 'हा सगळा प्रकार नुकताच माझ्या निदर्शनास आला… हे घडायला नको होतं! मी त्या गृहस्थाची माफी मागतो. यानंतर भविष्यात असे होणार नाही याची आवश्यक ती खबरदारी घेईन !'