ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट आणि कल्ट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जेव्हा कधी नाना पाटेकर यांच्या चित्रपटांचा उल्लेख होतो तेव्हा त्यात 'परिंदा'चाही आवर्जून उल्लेख केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का 'परिंदा'मध्ये गँगस्टर अन्ना सेठची अजरामर भूमिका साकारणाऱ्या नाना पाटेकर यांना या चित्रपटातून आधी काढून टाकण्यात आलं होतं. स्वत: नाना पाटेकर यांनी हा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे त्यांना चित्रपटातून बाहेर काढण्यामागे अनिल कपूर (Anil Kapoor) जबाबदार होता. 'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी नेमकं काय झालं होतं याचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पाटेकर यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं की,, ते आधी जॅकी श्रॉफने साकारलेली किशनची भूमिका साकारणार होते. पण तेव्हा स्टार म्हणून उदयास येणाऱ्या अनिल कपूरने त्यांना या चित्रपटातून बाहेर काढलं आणि ही भूमिका जॅकीच्या पारड्यात पडली. दरम्यान नाना पाटेकर यांनी साकारलेली भूमिका आधी नसरुद्दीन शाह साकारणार होते. 


पण जेव्हा नसीरुद्धीन शाह यांनी माघार घेतली तेव्हा यानंतर विधू विनोद चोप्रा यांनी नाना पाटेकर यांना विलनच्या भूमिकेची ऑफर दिली. नानांनी मुलाखतीत सांगितलं की, "मी नुकतंच अनिलला तू मला चित्रपटातून काढून टाकण्यासाठी विधू विनोद चोप्रावर प्रभाव टाकला होतास का? असं विचारलं. त्यावर अनिल कपूरने सांगितलं की, मला वाटलं मी नानाला स्टार कशाला बनवू?". 


जर नाना पाटेकर यांनी जॅकीची भूमिका निभावली असती तर ते स्टार म्हणून समोर आले असते आणि आपल्याला हवी तितकी प्रसिद्धी मिळाली नसती असं अनिल कपूरला वाटत होतं. पण नाना पाटेकर यांनी अनिल कपूरच्या चिंतेचं काहीच वाटलं नव्हतं. ते म्हणाले की, "मी अनिलला सांगितलं की, मला कोणतीही भूमिका दिली असती तरी मी स्टार झालो असतो हे तुला म्हटलं नव्हतं का? कोणीही तुझ्याकडे पाहणार नाही".


पण यानंतरही नाना पाटेकर यांच्या नशिबात परिंदा चित्रपट होताच. तीन ते चार महिन्यांनी विधू विनोद चोप्रा यांनी अन्नाच्या भूमिकेसाठी नाना पाटेकर यांना विचारणा केली. आपण सुरुवातीला रागावलेलो होतो असं नाना पाटेकर यांनी मान्य केलं. पण चोप्रा यांनी मार्केट रेटप्रमाणे पैसे देण्याचं मान्य केल्यानंतर ते तयार झाले होते. तसंच आपले विधू विनोद चोप्रा यांच्याशी मतभेद असून जेव्हा कधी भेट होते तेव्हा ती शेवटची असावी अशी प्रार्थना करतो असंही उपहासात्मकपणे म्हटलं.