अल्लू अर्जूनला अटक केल्यानंतर देण्यात आली विशेष वागणूक; जेलमध्ये खाल्ला भात आणि करी; पोलीस अधिकाऱ्याचा खुलासा
तेलंगणा कारागृह विभागाने (Telangana prisons department) अल्लू अर्जूनला (Allu Arjun) अटक करण्यात आल्यानंतर त्याने जेलमध्ये काय खाल्लं याचा खुलासा केला आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनला 132 डिसेंबरला शुक्रवारी अटक केल्यानंतर चंचलगुडा मध्य कारागृहात नेण्यात आलं होतं. हैदराबादमधील संध्या चित्रपटगृहात 'पुष्पा 2' चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिला रेवती यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान अटक केल्यानंतर कारागृहात असताना अल्लू अर्जूनने नेमकं काय केलं याचा खुलासा तेलंगणा कारगृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जूनला रात्रीच्या जेवणासाठी भार आणि व्हेज करी देण्यात आली होती. त्याने कारागृह प्रशासनाकडे कोणतीही विशेष सोयी सुविधांची मागणी केली नाही.
"तो तसा सामान्यच होता. तो कोणत्याही प्रकारे त्रस्त दिसत नव्हता. डिनरची वेळ ही संध्याकाळी 5.30 ची आहे. पण उशिरा दाखल झालेल्यांनाही अन्न दिलं जातं. अभिनेत्याला भात आणि व्हेज करी देण्यात आली होती. कोर्टाने दिलेल्या आदेशामननुसार, त्याला विशेष श्रेणीतील कैदी म्हणून वागणूक देण्यात आली," अशी माहिती अधिकाऱ्याने पीटीआयशी संवाद साधताना सांगितलं.
अल्लू अर्जुन अटक प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; 'ते' पत्र आलं समोर, पीडित महिलेचा नवरा म्हणतो, 'त्यानेच...'
विशेष श्रेणीतील कैद्यांना आराम करण्यासाठी खाट, टेबल आणि खुर्ची मिळण्याचा हक्क आहे. चेंगराचेंगरी प्रकरणात आरोपी असलेल्या इतरांसोबत अल्लू अर्जुनला तुरुंगाच्या एका वेगळ्या विभागात ठेवण्यात आल्याचंही अधिकाऱ्याने सांगितलं.
शुक्रवारी अटकेनंतर अभिनेत्याला संध्याकाळी 6.30 वाजता तुरुंगात आणण्यात आले आणि त्याला अंतरिम जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6.20 वाजता सुटका करण्यात आली. सुटकेनंतर अभिनेत्याने मीडियाशी संवाद साधला आणि कठीण काळात त्याला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. "मी प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. मला माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही. मी ठीक आहे. मी एक कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि सहकार्य करीन. मी पुन्हा एकदा माझ्या संवेदना व्यक्त करू इच्छितो. ही एक दुर्दैवी घटना होती, जे घडले त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत," असं अल्लू अर्जूनने सांगितलं.
अल्लू अर्जूनला अटक का केली?
हैदराबादमधील संध्या थिएटर येथे 4 डिसेंबर रोजी संध्याकाळी 'पुष्पा 2' चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली होती. अल्लू अर्जुन त्याचा चित्रपट पाहण्यासाठी येथे येणार असल्याचे सांगण्यात आलं होतं. अशा परिस्थितीत आपल्या आवडत्या स्टारला पाहण्यासाठी चाहत्यांची थिएटरबाहेर मोठी गर्दी जमली होती. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. या गर्दीला भेटण्यासाठी अल्लू अर्जुन अगदी शेवटी पोहोचला. अभिनेत्याला पाहण्यासाठी लोकांनी धाव घेतली आणि चेंगराचेंगरी झाली. याचे अनेक व्हिडिओ हैदराबादमधूनही समोर आले होते, ज्यामध्ये अल्लूच्या कारभोवती लोकांची गर्दी जमलेली दिसत होती.
या गर्दीत एक मुलगा बेशुद्ध झाला होता, तर एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. 'पुष्पा 2' पाहण्यासाठी ही महिला कुटुंबासह आली होती. अपघातानंतर काही दिवसांनी अल्लू अर्जुनने व्हिडिओ शेअर केला. या संपूर्ण प्रकरणावर त्याने पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रियाही दिली. अल्लू अर्जुन म्हणाला होता, 'संध्या थिएटरमध्ये जी दुर्घटना घडली ती घडायला नको होती. मी संध्याकाळी थिएटरमध्ये गेलो. मी पूर्ण सिनेमा पाहू शकलो नाही, कारण त्याच क्षणी माझ्या मॅनेजरने मला सांगितले की खूप गर्दी आहे, आपण येथून निघायला हवं".