पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांना अटक करण्यात आली असल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यांनी दिलं होतं. मात्र राहत फतेह अली खान यांनी इंस्टाग्रामला व्हिडीओ शेअर करत हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. दुबई विमानतळावरुन त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या असल्याचं पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटलं होतं. राहत फतेह अली खान यांचा माजी मॅनेजर सलमान अहमदने केलेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असल्याचंही सांगण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक माहितीनुसार, राहत फतेह अली खान आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी संयुक्त अरब अमिराती येथे आहेत. यावेळी बुर्ज दुबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा होता. राहत फतेह अली खान यांनी इंस्टाग्रामला शेअर केलेल्या व्हिडीओत सर्व दावे फेटाळले असून आपल्या चाहत्यांना यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. 


राहत फतेह अली खान काय म्हणाले आहेत?


राहत फतेह अली खान यांनी इंस्टाग्रामला व्हिडीओ शेअर केला आहेत. त्यात त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे. राहत फतेह अली खान यांच्या अटकेसंदर्भातील वृत्त खोटं आणि आधार नसणारं आहे असं कॅप्शन पोस्टला दिलं आहे. 


ते म्हणत आहेत की, "मी दुबईत माझी गाणी रेकॉर्ड करण्यासाठी आलो आहे. आमची गाणी चांगली असून, चांगलं काम करत आहोत. सगळं काही ठीक आहे. तुम्ही घाणेरड्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं. शत्रू पसरवत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका".



या वर्षाच्या सुरुवातीला, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (FIA) गायकाविरुद्ध मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपांची चौकशी सुरू केली होती. मागील 12 वर्षांमध्ये राहत फतेह अली खान यांनी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मैफिलींमधून सुमारे 8 अब्ज रुपये कमावल्याचा खुलासा त्याने केला होता.


राहत फतेह अली खान आधीच वादात अडकले होते. राहत फतेह अली खान यांचा मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे खळबळ माजली होती. ज्यामध्ये राहत फतेह अली खान यांनी दारूची बाटली हरवल्यावरुन एका बँड सदस्यावर कथितपणे हल्ला केला होता.