मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिस्कवरी वाहिनीवरील टेलिव्हिजन शो 'मॅन व्हर्सेस वाइल्ड'मध्ये भाग घेतला आहे. हा शो १२ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजल्यापासून दाखवण्यात येणार आहे. या शोचा सुत्रसंचालक (होस्ट) बियर ग्रिल्सला आतापर्यंत अनेक कठीण परिस्थितीत विचित्र, थरारक गोष्टी करताना पाहिलं आहे. पण आता तो पंतप्रधान मोदींसोबत दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पेशल एपिसोडचं शूटिंग निदेरियाच्या हिमालय फुट हिल्समध्ये झालं आहे. नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या एका प्रोमोमध्ये पंतप्रधान मोदी आणि बियर ग्रिल्स एकत्र जंगलात चालत असताना दिसत आहेत. यावेळी बियर ग्रिल्स मोदींना तुम्ही अतिशय सुंदर देशात राहत असल्याचं सांगतो. 


यावेळी बियर ग्रिल्स मोदींना ही एक धोकादायक जागा असल्याचं, इथे मोठ्या प्रमाणात जंगली जनावरं असल्याचं सांगतोय. त्यावर मोदी, आपण याला धोकादायक मानू नये. आपण जर निसर्गाशी संघर्ष केला तर सर्व काही धोकादायक आहे. निसर्गचं नाही तर, माणूसही धोकादायक होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. या जंगलात फिरताना ग्रिल्स मोदींशी अनेक गोष्टीवर चर्चा करताना दिसतोय. 



वन्यजीव संरक्षण आणि हवामान बदलाच्या धोक्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचा एक भाग बनले आहेत.


टेलिव्हिजन शोमधील मॅन व्हर्सेस वाइल्ड (Man Vs Wild) जगातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. जगभरातील अनेक नामांकित सेलिब्रिटी या शोचा एक भाग बनले आहेत. डिसेंबर २०१५ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला होता. कार्यक्रमाचा हा भाग अमेरिकेच्या अलास्का भागात शूट करण्यात आला होता.