Prajakta Mali : बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय ठरलेल्या 'फुलवंती' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राजक्ता माळी ही या चित्रपटाची निर्माती आहे. प्राजक्ता माळीने तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक लक्षवेधी मोशन पोस्टर शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. येत्या 11 ऑक्टोबर रोजी 'फुलवंती' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात प्राजक्ता माळी 'फुलवंती'च्या भूमिकेत झळकणार आहे. स्नेहल तरडे एक अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्या परिचयाच्या असून 'फुलवंती'च्या निमित्तानं त्या दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये एका सजलेल्या राजेशाही पालखीत भरजरी वस्त्रे आणि आभूषणे परिधान केलेली 'फुलवंती' दिमाखत बसलेली आहे.  या सौंदर्यवतीच्या मोहमयी रूपानं कोणीही घायाळ होईल. पोस्टरला देण्यात आलेल्या संगीतावरून हा संगीतमय चित्रपट असल्याचा अंदाज प्रेक्षक बांधू शकतात. मुळात पहिली झलक पाहूनच 'फुलवंती'ची भव्यता कळतेय. रसिकप्रेक्षकांसाठी सांगीतिक नजराणा असलेला हा चित्रपट; मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरची सर्वात भव्यदिव्य, अविस्मरणीय अशी कलाकृती ठरेल. 'पद्मविभूषण स्वर्गवासी बाबासाहेब पुरंदरे' यांच्या 'फुलवंती' या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

'फुलवंती'बद्दल प्राजक्ता माळी म्हणते, ''या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते. वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी देऊ शकले. याबद्दल देवाचे आभार. 'फुलवंती' माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मी निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आणि मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेकांनी मला विचारलं की 'फुलवंती'च का? फुलवंतीच्या कथानकाच्या मी प्रेमात पडले. साहित्य क्षेत्रातील काही दु्र्मिळ हिऱ्यांपैकी 'फुलवंती' एक आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या 'फुलवंती' या कांदंबरीवर चित्रपट व्हावा, अशी माझी मनापासून इच्छा होती. मागील तीन वर्षांपासून अत्यंत अभ्यास करून, मेहनत घेऊन आम्ही ही भव्य 'फुलवंती' तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. 'फुलवंती'मध्ये साथ लाभलेल्या पॅनोरमा स्टुडिओजच्या कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी, मंगेश पवार, अमोल जोशी, विक्रम धाकतोडे, श्वेता माळी आणि दिग्दर्शिका स्नेहल तरडे या सगळ्यांचेच मी आभार मानते. 'फुलवंती' आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. मला खात्री आहे, ही मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरची सर्वात भव्य कलाकृती ठरेल.''


हेही वाचा : 'ही काय बाग आहे का' न विचारता VIDEO शूट करणाऱ्या चाहत्यावर विक्रांत मेसी संतापला आणि...


पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, मंगेश पवार ॲन्ड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित या चित्रपटाचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी निर्माते आहेत. तर अमोल जोशी प्रॉडक्शन्स, मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी, सहनिर्माते आहेत तर विक्रम धाकतोडे सहाय्यक निर्माते आहेत या चित्रपटाचे संवादलेखन प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केले असून; प्रसिद्ध छायाचित्रकार महेश लिमये यांनी छायाचित्रणाची तर संगीताची जबाबदारी अविनाश - विश्वजीत यांनी सांभाळली आहे. 'फुलवंती'च्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली असून; वितरणाची धुराही पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे.