Prakash Raj : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची घोषणा केली असून देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी निकाल लागणार आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच सत्ताधारी आणि विरोधक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. फिल्मी क्षेत्रासोबत राजकारणातही सक्रिय असणाऱ्या काही कलाकारांनी देखील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेते प्रकाश राज आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यामध्ये आघाडीवर आहेत. दोघांनीही भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी कर्नाटकातील चिकमंगळू येथील एका कार्यक्रमात बोलताना भाजपला लक्ष्य केलं आहे. ज्यांनी फसवणूक केली ते आज येत्या लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकणार असल्याचं बोलत आहेत, असे प्रकाश राज यांनी म्हटलं. भाजपने यावेळी 400 पेक्षाही जास्त जागा जिंकण्याची घोषणा भाजप नेत्यांनी दिली आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत 400 जागा मिळवून सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे.


एनडीए 400 जागा जिंकणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्यावर प्रकाश राज यांनी खरपूस समाचार घेतला. "ज्यांनी 420 केली तेच 400 जागा आणण्याची चर्चा करत आहेत. मग तो कोणताही पक्ष असो, काँग्रेस असो किंवा इतर कोणताही पक्ष, यातून तुमचा अहंकार दिसून येतो. लोकशाहीत कोणत्याही एका पक्षाला ४०० किंवा त्याहून अधिक जागा मिळण्याची शक्यता नाही. तुम्ही ती जागा तेव्हाच जिंकू शकता जेव्हा जनता तुम्हाला निवडून देते. कोणताही राजकीय पक्ष दावा करु शकत नाही की, पुढे येऊन जागा जिंकू शकतो. याला अहंकारच म्हटलं जाईल," असे प्रकाश राज म्हणाले.


हेही वाचा : फक्त मुलं नाही तर वृद्धांचीही काळजी घ्यायचा 'हा' अभिनेता, 1800 मुलांना घेतलं होतं दत्तक


दुसरीकडे अभिनेत्री स्वरा भास्करनेही भाजपवर टीका केली आहे. स्वरा भास्करने राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे कौतुक करताना पंतप्रधान मोदींवर टीका केली. "मला असा एकही राजकारणी माहिती नाही जो देशाच्या प्रत्येक भागात गेला असेल. कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई असा प्रवास करून जनतेचे म्हणणे ऐकून घेतलेला असा कोणी राजकारणी माझ्या मनात नाही कारण असे अनेक राजकारणी आहेत जे आपल्या मनाला काय वाटतं तेच सांगत राहतात," असे म्हणत स्वरा भास्करने मन की बात कार्यक्रमावरुन पंतप्रधानांवर टीका केली.


काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?


5 फेब्रुवारी रोजी संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए 400 पेक्षा जास्त जागांसह पुन्हा सत्तेत येईल असे म्हटलं होतं. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. 'आता आमची तिसरी टर्म दूर नाही. कमाल 100-125 दिवस शिल्लक आहेत. संपूर्ण देश म्हणतोय की यावेळी 400 पार करा. एकट्या भाजपला 370 जागा मिळतील आणि एनडीएच्या गटाला 400 जागा मिळतील,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.