मुंबई : क्रिकेटर हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात पाहुणे म्हणून दाखल झालेल्या हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांना महिलांबद्दल वाचाळ बडबड करताना अनेकांनी पाहिलं. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठलीय. या कार्यक्रमाचं चित्रिकरण प्रसारित झाल्यानंतर हार्दिक पांड्या सोशल मीडियावर ट्रोल होतोय. इतकंच नाही तर बीसीसीआयनंही हार्दिक पांड्यावर कारवाई केलीय. यानंतर टीव्ही अभिनेत्री, कवयित्री आणि स्टॅन्ड अप कॉमेडियन प्रिया मलिक हिनं हार्दिक पांड्याला आपल्या अंदाजात प्रत्यूत्तर दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिस्टर प्लेअर' नावानं लिहिलेल्या एका कवितेद्वारे प्रियानं हार्दिकला हे प्रत्यूत्तर दिलंय. प्रियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 



हार्दिकनं कार्यक्रमात महिलांबद्दल केलेल्या टिप्पणीनंतर बीसीसीआयनंही कठोर कारवाई करत पांड्या आणि के एल राहुल दोघांनाही चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केलंय. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर दोघांनाही ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या तीन वनडे मॅच सीरिज अर्धवट सोडून स्वदेशी परतावं लागलंय. या निर्णयानंतर दोघांनीही विनाअट माफीदेखील मागितली होती.


केवळ बीसीसीआय नाही तर खार जिमखानानं हार्दिकला २०१८ साली देण्यात आलेली तीन वर्षांची मानद सदस्यता परत घेण्याचा निर्णय घेतलाय. 


अनेक महिलांसोबत संबंध बनवणं आणि याबद्दल आपल्या आई-वडिलांशी खुलेपणानं बोलण्याबद्दल पांड्या आणि के एल राहुल यांनी 'कॉफी विथ करण' कार्यक्रमात चर्चा केली होती. याबद्दल त्यांना सोशल मीडियावर टीकेचा सामनाही करावा लागला.