`हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार...`, अशोक सराफ यांचं कौतूक करत राज ठाकरे यांची खास पोस्ट!
Maharashtra Bhushan Award : आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अशोक सराफ यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होताना दिसतोय. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray On Ashok Saraf) यांनी देखील ट्विट करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलंय.
Raj Thackeray On Ashok Saraf : अशोक सराफ (Ashok Saraf) यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. गेली 5 दशकं अशोक सराफ यांनी विनोदी भूमिकांनी रसिकांना मनमुराद हसवलं. त्याचबरोबर असंख्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य देखील केलंय. मराठीच नव्हे तर हिंदी कलाक्षेत्रात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अशोक सराफ यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होताना दिसतोय. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलंय.
काय म्हणाले राज ठाकरे?
अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर झाला, त्याबद्दल अशोक सरांचे मनापासून अभिनंदन. मी मागे एकदा म्हणालो तसं, एकाच वेळेला सिनेमा, रंगभूमी आणि टीव्ही या तिन्ही माध्यमांवर हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार या देशाने खूप कमी पाहिले, अशोक सर त्यातले एक...
मराठीत कलाकारांचा अजिबात तुटवडा नाही, पण आपल्या भाषेच्या सीमा ओलांडून एखादा नट देशव्यापी ओळखला जातोय किंवा त्यासाठी प्रयत्न करतोय असं दिसत नाही. पण अशोक सर या बाबतीत देखील अपवाद ठरले, असं राज ठाकरे म्हणतात.
महाराष्ट्र भूषण सारखे राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कलाकरांना ते उमेदीत असताना मिळावेत असं मला वाटतं. अर्थात हे प्रत्येक वेळेला होतंच असं नाही पण अशोक सरांच्या बाबतीत राज्य सरकारने योग्य टप्प्यावर त्यांचा उचित सन्मान केला याबद्दल राज्य सरकारचं पण मनापासून अभिनंदन... पुन्हा एकदा अशोक सराफ सरांचे मनःपूर्वक अभिनंदन, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मामा नाही 'सर' म्हणा..!
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, अशोक सराफांना मामा म्हटल्याने रागावले होते. "एकदा अशोक सराफांच्या कार्यक्रमाला गेलो होतो, त्यांना मी सरच म्हणतो. ही सर म्हणण्यासारखीच माणसे. अशा लोकांना सर म्हणायंच नाही तर काय म्हणायचं? तुम्ही पब्लिकली यांना मामा म्हणता... सख्खे मामा लागतात का ते तुझे? एवढ्या मोठ्या कलावंतांना सर म्हटलं पाहिजे, असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता.
दरम्यान, आत्तापर्यंत अशोक सराफ यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 45 पेक्षा जास्त वर्षे होऊन अशोक मामांच्या अभिनयाची जादू आजही कायम आहे. ज्यांना पाहून अनेकजण लहानाची मोठी झाली, ज्यांच्या अभिनयाने अनेकजण आपलं दु:ख विसतात, अशा कलाकाराला महाराष्ट्र राज्याच्या सर्वात मोठा सन्मान मिळतो ही अभिमनाची बाब आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.