नवी दिल्ली : रविवारी मॅनचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात भारत-पाकिस्तान सामना रंगला. भारताने ७९ धावांनी पाकिस्तानचा पराभव करत सलग सातव्यांदा पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला. हा जबरदस्त सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहदेखील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात हजर झाला होता. सामन्यादरम्यान रणवीरने कॉमेंट्रीही केली. सामन्याच्या सुरुवातीपासून ते सामना संपेपर्यंत रणवीर भारतीय संघाला चिअर्स करत होता. यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रणवीर पाकिस्तान हरल्यामुळे निराश झालेल्या एका चाहत्याला मिठी मारत समजवताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-पाकिस्तान सामन्यात भारताच्या दमदार विजयानंतर रणवीर एका निराश पाकिस्तानी चाहत्याचं सांत्वन करताना दिसत आहे. चाहत्याला मिठी मारत रणवीरने 'निराश होऊ नको, पुढच्या वेळी पुन्हा संधी मिळेल. पाकिस्तान चांगलं खेळला. खेळाडू खेळासाठी समर्पित करणारे आहेत, ते वचनबद्ध असून पुढच्या वेळी कमबॅक करतील' असं रणवीरने त्याला समजवताना म्हटलंय.






या पाकिस्तानी चाहत्याने आपल्या ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर केला असून सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक पाकिस्तानी चाहत्यांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. 


अभिनेता रणवीर सिंह सध्या इंग्लंडमध्ये त्याच्या आगामी '८३' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १९८३ मध्ये भारतीय संघाने जिंकलेल्या विश्वचषकावर आधारित आहे. ज्यात रणवीर सिंह माजी भारतीय क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दीपिका पदुकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.