मला तुमची पत्नी कराल? कोण होती पंडित जवाहरलाल नेहरु यांना हा प्रश्न विचारणारी गंगू?
गंगा तिथं आली आणि तिच्या पावित्र्यावर अगणित अत्याचार झाले, तिथेच जन्म झाला गंगूचा... पाहा हृदयद्रावक कहाणी
मुंबई : मुंबईला मायानगरी असंही म्हणतात. आता माया या शब्दाचा अर्थ तुम्ही घ्याल तसा. कारण, प्रत्येकासाठी ही मायानगरी तितक्याच वेगळ्या रुपांत समोर आली. प्रत्येकाला तिनं वेगळे अनुभव दिले. मुंबईच्या याच झगमगाटाला पाहून त्यावर आणि इथल्या चित्रपटसृष्टीवर भाळलेली गंगा.
गंगा हरजीवनदास काठीयावाडी असं तिचं पूर्ण नाव. तिला अभिनेत्री व्हायचं होतं. वयाच्या 16 व्या वर्षी गंगाला आपल्या कुटुंबासाठी काम करणाऱ्या रमणिकवर प्रेम जडलं. (Gangubai Kathiyawadi)
पुढे तिनं त्याच्याशी पळून जाऊन लग्न केलं आणि मुंबईची वाट धरली. पण, हे लग्न नव्हतं. गंगा फसली होती.
ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं, ज्याच्याशी पळून जाऊन लग्न केलं, त्यानंच गंगाला 500 रुपयांसाठी विकलं. कोठ्यावर आपल्याला विकलं गेलं हे पचवणं गंगाला कठिण होतं.
पण, परिस्थितीला तिनं स्वीकारलं आणि गंगाची गंगू झाली. गंगूवर करीम लालाच्या गटातील एकानं इतके अत्याचार केले, की शेवटी तिनं करीम लालाचं घर गाठलं.
इथे सुरुवातीला तिला छतावर बसवण्यात आलं, पण आपल्याला मिळालेली ही वागणूक तिच्य़ा लक्षात आली. जे घर माझ्या येण्यानं खराब होईल त्या घरातच्या भांड्यात खाऊन मला ते घाण नाही करायचं, असं गंगू करीम लालाला स्पष्ट म्हणाली.
आपल्या माणसानं तिला दिलेली वागणूक पाहून लालानं तिला सुरक्षिततेची हमी दिली. या क्षणी मला कधीच कोणत्या पुरुषानं इतकं सुरक्षित वाटू दिलं नव्हतं, असं ती म्हणाली आणि करीम लालाच्या मनगटावर राखीचं प्रतीक असणारा धागा बांधला.
करीम लालाची बहीण होताच गंगूच्या नावाला वजन मिळालं. इथला एक कोठा तिच्या हातात आला. कोणत्याही मुलीला तिच्या मनाविरोधात या व्यवसायात आणल्यास गंगू तिला कोठ्यावर ठेवत नसे.
देहव्यापार करणाऱ्या महिला आणि त्यांची मुलं, अनाथ मुलं या सर्वांसाठी गंगूनं काम केलं. कमाठिपुरा मुंबईतून काढून टाकण्याच्या चर्चा होताच गंगूनं याला तीव्र विरोध केला.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापर्यंत ती जाऊन पोहोचली. तिथे तुम्ही हा व्यवसाय न करता नोकरीही करु शकत असता, चांगला पती मिळवू शकता, अशा आशयाचं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलं, असं म्हटलं गेलं.
नेहरुंच्या या वक्तव्यावर व्यक्त होत, तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करताय तर मी हे काम लगेच सोडते, असा प्रस्ताव गंगूने त्यांच्यासमोर ठेवला.
सल्ला देणं सोपं असतं पण, तो अंमलात आणणं कठीण अशा शब्दांत तिनं त्यांना वस्तुस्थिती सांगितली.
गंगुबाईनं कमाठिपुऱ्यातील स्थानिक निवडणूक गाजवली. देहव्यापार करणाऱ्या महिलांसाठी बेफाम काम केलं. अनेकांचा रोष पत्करला.
जीवनातील या कार्यासाठी आजही अनेकजण त्यांचे ऋणी आहेत. आजही कमाठीपुऱ्यामध्ये त्यांचे पुतळे दिसतात. आजही त्यांना तिथे तितकाच मानही मिळतो.