मुंबई : दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री निधन झालं. भाचा मोहील मारवाहच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. लग्न झाल्यानंतर श्रीदेवीचे नातेवाईक परत आले पण श्रीदेवींनी मात्र काही दिवस तिकडेच राहण्याचा निर्णय घेतला. दुबईमधल्या जुमैरा एमिराट्स टॉवर या हॉटेलमध्ये श्रीदेवी थांबल्या होत्या. हॉटेल रुमच्या बाथरूममध्ये श्रीदेवी बेशुद्ध आढळून आल्या. यानंतर त्यांना दुबईच्या राशित रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९६३ साली जन्म झालेल्या श्रीदेवीनं १९६७मध्ये बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. श्रीदेवीनं हिंदीबरोबरच तेलगू, तामीळ, कन्नड आणि मल्ल्याळी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. २०१२ साली तिनं इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून कमबॅक केलं. २०१३ साली श्रीदेवीला पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.


१५ वर्षांच्या ब्रेकनंतर कमबॅक


१९९७ साली आलेल्या जुदाई चित्रपटानंतर श्रीदेवीनं १५ वर्ष ब्रेक घेतला. २०१२ साली इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून तिनं कमबॅक केलं आणि पुन्हा स्वत:ला सुपरस्टार म्हणून सिद्ध केलं. २०१७ साली आलेला मॉम हा तिचा चित्रपटही यशस्वी ठरला. मॉम हा श्रीदेवींचा ३००वा चित्रपट होता.


हॉलीवूड चित्रपटाची ऑफर धुडकावली


१९९३ साली हॉलीवूड चित्रपट जुरासिक पार्कमध्ये काम करण्यासाठी श्रीदेवींना ऑफर देण्यात आली होती. चित्रपटाचा डायरेक्टर स्टिव्हन स्पीलबर्गनं श्रीदेवींना या चित्रपटासाठी विचारणा केली होती. पण बॉलीवूडमधला लगाव पाहता त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. या चित्रपटामध्ये छोटा रोल असल्यामुळे श्रीदेवींनी नकार दिल्याचंही बोललं जातंय.