मुंबई : 'गेम ऑफ थ्रोन्स' Game of Thrones या प्रचंड गाजणाऱ्या सीरिजच्या अखेरच्या पर्वातील चौथ्या भागात एक मोठी चूक झाल्याचं लक्षात आलं आहे. 'द लास्ट ऑफ द स्टार्क्स' The Last of the Starks या भागात विंटरफॉलचं युद्ध जिंकल्यावर झाल्यानंतरच्या जल्लोषावेळीच्या दृश्यादरम्यान, टेबलवर स्टारबक्सच्या टेक अवे कॉफीचा मग दिसत आहे. ही चूक लक्षात येताच प्रेक्षक आणि नेटकऱ्यांनी मालिकेच्या दिग्दर्शकांवर टीकेची झोड उठवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल्पनिक कथानकावर आधारलेल्या या मालिकेचा कालखंड हा अगदी जुना आहे. किंबहुना याच कालखंडाच्या अविश्वसनीय दुनियेची प्रेक्षकांना भुरळ होती. ज्यामध्ये काही भागांमध्ये धातूच्या पेल्यांमधून मद्यपान करणारी काही पात्रही दाखवण्यात आली आहेत. अशा या एकंदर प्रसंगात आधुनिक काळातील प्रचंड लोकप्रिय अशा कॉफीचा टेक अवे डिलीव्हरी मग दिसतो. पण, कथानकाचा एकंदर कालखंड आणि आखणी पाहता हे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे ही चूक झालीच कशी? असाच प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 



'गेम ऑफ थ्रोन्स' या सीरिजच्या एक्सिक्युटीव्ह प्रोड्युसर्सपैकी एक असणाऱ्या Bernie Caulfield यांनी या चुकीसाठी चाहत्यांची माफीही मागितली आहे. 'यावर माझा विश्वासच बसत नाहीये.....'. सीरिजचा हा भाग करोडो चाहत्यांनी पाहिला असून, आता अनेक स्तरांतून त्याविषयीच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. किंबहुना या चुकीवरुन सीरिजची खिल्लीही उडवण्यात येत आहे. त्यामुळे एका क्षणाला प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणाऱ्या या सीरिजला एका नजरचुकीचा चांगलाच फटका बसला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.