शाहरुखला सतत ओरडायचे `कौन बनेगा करोडपती` चे निर्माते, किंग खाननं स्वत: सांगितलं `हे` मोठं कारण
Shah Rukh Khan on KBC : शाहरुख खाननं दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समितमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं खुलासा करत सांगितलं की `कौन बनेगा करोडपती` करत असताना शोचे निर्माते त्याच्यावर सतत ओरडायचे.
Shah Rukh Khan on KBC : छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' हा शो सगळ्यांनाच माहित आहे. हा शो म्हटलं की सगळ्यात आधी काही आठवतं तर ते आहेत दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन आणि 'कौन बनेगा करोडपती' या शोची नावं एकत्र घेतली जातात. पण तुम्हाला माहितीये का? या शोचं तिसरं पर्व हे शाहरुख खाननं होस्ट केलं होतं. या शोचा सुत्रसंचालक झालेला शाहरुख खानच्या चार्मनं सगळ्यांची मने जिंकली होती. मात्र, या शोचे निर्माते हे शाहरुखवर सतत ओरडत रहायचे. तर त्याचं कारण काय आहे याविषयी स्वत: शाहरुखनं खुलासा केला आहे.
शाहरुख खाननं काल म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समितमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यानं फक्त 'कौन बनेगा करोडपती' विषयी सांगितलं नाही तर त्यासोबत खुलासा देखील केला की त्याला 'स्लमडॉग मिलियनेयर' ची ऑफर देखील मिळाली होती. मात्र, त्यानं या ऑफरला नकार दिला होता.
यावेळी शाहरुखला विचारण्यात आलं होतं की 'कौन बनेगा करोडपति' मध्ये जेव्हा कोणताही स्पर्धक हा एक कोटी जिंकण्याच्या जवळ पोहोचायचा किंवा पोहोचायची तेव्हा त्याला कसं वाटायचं. यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला, 'माझी खरंच इच्छा असायची की त्यांनी हा खेळ जिंकायला हवा. खूप लोकं होते जे देशातल्या वेगवेगळ्या भागातून आले होते. अनेकदा असं झालं की जेव्हा मला त्यांची मदत करायची इच्छा व्हायची. पण तुम्हाला माहितीये, तुम्ही ते करू शकत नव्हतात. निर्माते कानात ओरडायचे की तुम्ही हे करू शकत नाही. तुम्ही आधीच खूप मदत केली आहे. तर शेवटचे दोन-चार प्रश्न हे खूप कठीण असायचे.'
हेही वाचा : 'व्हॅलेंटाइन डे'चं निमित्त साधत प्रथमेश परबचा साखरपुडा, प्रेमाच्या मुहूर्तावर नात्याला नवं नाव
शाहरुखला अनेकदा स्पर्धकांची मदत करण्याची इच्छा व्हायची मात्र, बऱ्याचवेळा त्यालाच योग्य उत्तरं ही माहित नसायची. कधी तर अचानक एक कठीण प्रश्न समोर यायचा आणि त्याला ते पाहून वाईट वाटायचं की स्पर्धकाला त्याचं उत्तर माहित नाही आहे. तेव्हा तो स्पर्धकाला कोणती हिंट किंवा मग एखादा इशारा देण्याचा प्रयत्न करायचा.