Shikara Movie Review : काश्मिरी पंडितांची व्यथा मांडतोय `शिकारा`
शिकारामधून `ती` सल केली व्यक्त
मुंबई : काश्मिरी पंडितांवर (Kashmiri Pandit)आधारित सिनेमा शिकारा (Shikara) हा 1989 मध्ये घडलेल्या परिस्थितीचं चित्रण उभं करतं. यावेळी काश्मिरी पंडितांना काश्मिर सोडावं लागलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन विधु विनोद चोप्रा यांनी केलं असून सिनेमात एका दाम्पत्याला केंद्रीत केलं आहे. या जोडप्याच्या माध्यमातूनच काश्मिरी पंडितांची व्यथा प्रेक्षकांसमोर मांडली आहे.
दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा देखील स्वतः काश्मिरमधून स्थलांतरीत आहेत. त्यामुळे त्यांनी काश्मिरी पंडितांची व्यथा खूप संवेदनशीलपणे मांडली आहे. हा सिनेमा ऐतिहासिक ड्रामा रोमँटिक सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. हा सिनेमा शुक्रवारी आज 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.
शिव आणि शांती या नवदाम्पत्यावर आधारित हा सिनेमा आहे. या दोघांना एका रात्रीत आपलं घर, काश्मिर सोडावं लागतं. आज पुन्हा काश्मिरमध्ये येऊ या आशेवर हे दोघं अनेक वर्ष रिफ्युझी कॅम्पमध्ये राहतात.
शिव आणि शांती काश्मिरमध्ये खूप चांगल आणि आनंदी जीवन जगत असतात. दोघं अनेक प्रयत्न करून एक छोटंस घर बांधतात त्याला 'शिकारा' असं नाव देतात. त्याचवेळी घाटीत दहशतवादी हिंसा वाढू लागते. काश्मिरी पंडितांना घाटी सोडून जाण्यासाठी धमकावलं जात असतं. दिवसेंदिवस तणाव वाढतो, अशातच आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई सोडून दोघं निघून जातात. 19 जानेवारी 1990 मध्ये काश्मिरी पंडितांना बेघर केलं जातं. यावर हा सिनेमा आधारित आहे.
शिव आणि शांतीची भूमिका आदिल खान आणि सादिया काफी यांनी साकारली आहे. हा दोघांचाही पहिला सिनेमा आहे मात्र दोघांनी उत्तम अभिनय केला आहे. विधु विनोद चोप्रा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.