मुंबई : ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रंगभूमी गाजवलेले 'नटसम्राट' अशी लागूंची किर्ती. श्रीराम लागूंच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळ व्यक्त करत आहे. असं असताना अभिनेता सुबोध भावेने डॉ लागूंसोबतच्या खास आठवणी शेअर केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलेवर आणि नाटकावर मनापासून प्रेम करणारे,नवीन पिढीला सातत्याने प्रोत्साहित करणारे,आयुष्यभर सामाजिक भान जपणारे,आम्हा सर्वांचे आदर्श आणि आदराचे नटसम्राट डॉ.श्रीराम लागू. तुम्ही शरीराने जरी आमच्यात नसलात तरी तुमच्या स्मृती नेहमीच आमच्या सोबत असतील. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली... अशा भावना सुबोध भावेने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. 



तसेच आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी खास आठवण शेअर केली आहे. 'कट्यार' सिनेमाचा मुहूर्त डॉ. लागूंच्या हस्ते करण्यात आला होता. त्यावेळेचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. 



'कट्यार काळजात घुसली' या सिनेमात सुबोध भावेने सदाशिवची भूमिका साकारली होती. सुबोधने शेअर केलेल्या फोटोत डॉ लागू मुहूर्ताचा फ्लॅप घेऊन आहेत तर त्याच फ्रेममध्ये सुबोध भावे सदाशिवच्या भूमिकेत झाडाखाली बसला आहे.


तसेच अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील डॉ. श्रीराम लागूंना श्रद्धांजली अर्पण केली आहे. फेसबुक पोस्टकरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'नांदीनंतर पडदा उघडला तेंव्हा मी तुडूंब भरलेला होतो.. डाॅक्टर , तुमच्या आठवणी आमच्या मनांत कायमच तुडूंब गर्दी करतील .. तुमच्या हाऊसफुल्ल कारकिर्दीस मानाचा मुजरा', अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 



डॉ श्रीराम लागू यांनी 'सामना', 'सिंहासन', 'पिंजरा' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 'नटसम्राट' या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली.