सनी देओलची मुख्य भूमिका असणाऱ्या 'गदर 2' (Gadar 2) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) अक्षरश: वादळ आणलं आहे. चित्रपटाने यापूर्वीचे अनेक रेकॉर्ड्स उद्ध्वस्त केले असून अद्यापही कमाई करत आहे. सनी देओलच्या अभिनयाचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही गदर चित्रपटाचीच चर्चा आहे. दरम्यान, सनी देओलची सावत्र आई हेमा मालिनी (Hema Malini) यांनीही हा चित्रपट पाहिल्यानंतर तोंडभरुन कौतुक केलं आहे. यावर सनी देओलनेही (Sunny Deol) प्रतिक्रिया दिली आहे. 


हेमा मालिनी यांच्याकडून गदरचं कौतुक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमा मालिनी यांनी शनिवारी चित्रपटगृहात जाऊन 'गदर 2' चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हेमा मालिन यांनी आपल्याला चित्रपट फार आवडला असल्यांच सांगताना सनी देओलच्या अभिनयाचंही कौतुक केलं. त्यांनी म्हटलं की "गदर पाहून आली आहे. चित्रपट फारच चांगला वाटला. जशी अपेक्षा होती तसाच चित्रपट होता. फारच मनोरंजक आहे. असं वाटत आहे की, 70 आणि 80 च्या दशकातील चित्रपटांसारखा काळ आहे. अनिल शर्मा यांनी तो काळ जिवंत केला आहे. त्यांनी फार सुंदर दिग्दर्शन केलं आहे".


पुढे त्यांनी म्हटलं होतं की "सनीने जबरदस्त अभिनय केला आहे. उत्कर्ष शर्मानेही चांगला अभिनय केला आहे. नवीन अभिनेत्रीही फार चांगली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होते. तसंच चित्रपटाच्या शेवटी मुस्लिमांप्रती बंधुभाव दाखवण्यात आला आहे".


सनी देओल झाला व्यक्त


सनी देओलने इन्स्टाग्रामला हेमा मालिनी चित्रपट पाहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतानाचा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. यावेळी त्याने काहीही कॅप्शन दिलेली नाही. तसंच झी स्टुडिओजने 'गदर 2'च्या स्क्रिनिंगदरम्यान शेअर केलेला हेमा मालिनी यांचा फोटोही रिपोस्ट केला आहे. 'जेव्हा भारताची ड्रीम गर्ल भारताच्या सुपूत्राला पाहण्यासाठी येते', असं कॅप्शन या फोटोला दिसत आहे. 




'गदर 2' चित्रपट हा आधीच्या चित्रपटाचाच पुढील भाग आहे. या सिक्वेलमध्ये तारा सिंग पाकिस्तानात अडकलेल्या आपल्या मुलाला सोडवण्यासाठी पुन्हा एकदा सीमारेषा पार करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात 1971 चा काळ दाखवण्यात आला आहे. तसंच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष भडकावणाऱ्यांविरोधात भाष्य करण्यात आलं आहे. अनिल शर्मा यांनीच 'गदर 2'चंही दिग्दर्शन केलं आहे. 11 ऑगस्टला गदरसह अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' देखील प्रदर्शित झाला आहे. पण एकत्र प्रदर्शित होऊनही दोन्ही चित्रपट यशस्वी ठरले आहेत.