चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी दिसणार सिंघमच्या भूमिकेत
Swapnil Joshi : स्वप्नील जोशीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, आता अभिनेता दिसणार हटके भूमिकेत...
Swapnil Joshi : मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस आणि चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा हीरो म्हणजे स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशी हा नेहमीच वेगवेगळ्या धाटनीच्या भूमिका साकारताना दिसतो. आता चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा आपल्या सगळ्यांचा लाडता स्वप्नील जोशी हा बेधडक आणि डॅशिंग अंदाजात लवकरच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता स्वप्नीलचा हा डॅशिंग अंदाज कसा आणि कुठे पाहायला मिळणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर स्वप्नीलचा हा डॅशिंग अंदाज त्याच्या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
स्वप्नील आता त्याचा आगामी ‘जिलबी’ या मराठी चित्रपटात विजय करमरकर या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दमदार मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्वप्नीलनं सांगितलं की, ‘आपला पोलिसी खाकी दाखवत चोख कामगिरी बजावणारा हा पोलीस अधिकारी आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला करायला मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. विशेष म्हणजे पोलिसांचा अंदाज, त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचा लहेजा हे सगळं करण्यात एक वेगळीच मज्जा आली. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा ‘जिलबी’ हा चित्रपट आहे. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून पडायचं नसल्यानं ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं देखील स्वप्नीलनं यावेळी सांगितलं.
स्वादिष्ट जिलबी वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जात असते.‘जिलबी’ हा चित्रपटसुद्धा वेगवेगळ्या चवींचा आस्वाद आपल्याला देणार आहे, ज्यात विविध व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये आणि त्यासोबत रहस्याचा थरार असं बरंच काही आहे.
हेही वाचा : साऊथ अभिनेत्याला मराठ्यांच्या इतिहासाची भुरळ; साकारणार शिवरायांची भूमिका
‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ 17 जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे.