मुंबई : गेली कित्येक वर्ष तरूणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आता खलनायकी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीच गोड भूमिकांमधून आपल्यासमोर आलेल्या स्वप्नील जोशीचा एक वेगळा लूक नुकताच लाँच झाला. रणांगण चित्रपटाच्यानिमित्ताने हा मराठी सिनेसृष्टीचा नायक आता खल-नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून रणांगणात सुरू असलेलं एक वेगळंच युध्द प्रेक्षकांसमोर येणार आहे. ज्यात स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर एकमेकांविरोधात उभे आहेत. या रणांगणात स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकरबरोबरच, सिध्दार्थ चांदेकर, प्रणाली घोगरे, सुचित्रा बांदेकर आणि आनंद इंगळे अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.


52 विक्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स्) आणि हार्वे फिल्म्स निर्मित रणांगण या चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे. तर अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. बाप-मुलाला एकमेकांविरोधात उभं करणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश सारंग यांनी केले आहे.
 
रोमँटिक भूमिका साकारून तरूणींच्या मनात घर करणारा स्वप्नील जोशी रणांगण या चित्रपटातून पहिल्यांदाच खल-नायकाच्या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहे. रणांगण चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणारा हा स्वप्नीलमधील खल-नायक प्रेक्षकांना कितीसा भावतो, हे लवकरच कळेल.