मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah). मालिकेने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. पण यशाची पायरी चढत असताना मालिकेला अनेक छोट्या मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. त्यातील एक मोठं संकट म्हणजे अभिनेते घनशाम  नायक म्हणजे लाडक्या नट्टू काकांचं निधन. नट्टू काकांच्या निधनानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल झाला. फोटोमध्ये दिसणारा व्यक्ती यापुढे मालिकेत नट्टू काकांची भूमिका साकारताना दिसणार असल्याच्या  चर्चा रंगत होत्या. पण यावर आता मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एका मुलाखतीत मोदी यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. 



एका मुलाखती दरम्यान मोदी म्हणाले, 'नट्टू काकांच्या जागी सध्या कोणीही येणार नाही. ज्येष्ठ अभिनेत्यांचं निधन होवून एक महिना देखील झालेला नाही. ते माझे चांगले मित्र होते. आम्ही एकत्र काम केलं आहे. मालिकेमधील त्यांच्या योगदानाचा आम्ही आदर करतो. आत्तापर्यंत, आम्ही त्यांच्या भूमिकेबाबत काहीही नियोजन केलेले नाही. अनेक अफवा उडत आहेत, पण मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी त्याकडे लक्ष देऊ नये.'


व्हायरल फोटो मागचं सत्य
फोटो व्हायरल झाल्यानंतर दुकानाचे मूळ मालक शेखर गढिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, 'काही लोक चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी चालवतात. नट्टू काकांच्या बदलीची बातमीही त्यातलीच एक. व्हायरल झालेला फोटो माझ्या वडिलांचा आहे. ते या दुकानाचे खरे मालक आहेत. ' 3 ऑक्टोबर रोजी घनश्याम नायक यांचे निधन झाले.