`या` अभिनेत्रीकडून महेश भट्ट यांची पोलखोल; लावले गंभीर आरोप
प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट बॉलिवूडचं असं एक नाव आहे ज्याच वादांशी एक जुनं कनेक्शन आहे.
मुंबई : प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट बॉलिवूडचं असं एक नाव आहे ज्याच वादांशी एक जुनं कनेक्शन आहे. काहीवेळा महेश भट्ट यांना वादग्रस्त वक्तव्यांसाठी सेलिब्रिटींनी केलेल्या आरोपांमुळे खूप बदनामीला सामोरे जावं लागलं आहे. यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री मीराच्या नावाचा समावेश आहे. जिने महेश भट्ट यांच्यावर स्वतःचं शोषण केल्याचा आरोप केला होता. ज्यामुळे तिला बॉलिवूडही सोडावं लागलं होतं.
कराचीमध्ये एका मुलाखतीमध्ये बोलताना मीराने सांगितलं की, महेश भट्ट यांना इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबत काम करायचं नव्हतं. त्यांच्यामुळेच तिने बॉलिवूड सोडलं आणि जेव्हा तिने परत येण्याचा प्रयत्न केला तेव्हा महेश भट्ट यांनी तिला येऊ दिलं नाही.
सोपा नव्हतं बॉलिवूडचा प्रवास
मीरा म्हणाली, "बॉलिवुडमध्ये काम करण्याचा अनुभव खूप छान होता. मला भारतीय प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. पण बॉलिवूडचा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता. अनेक अडचणी आल्या पण मी हार मानली नाही. सुरुवातीच्या काळात बॉलिवूड माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. मी मुंबईत महेश भट्ट सोडून कोणाला ओळखत नव्हते. लोकांना ओळखायला खूप वेळ लागला. महेश भट्ट यांनी माझी इंडस्ट्रीशी ओळख करून दिली. मी महेशजींचा खूप आदर करायचे. ते माझे गुरू होते. माझ्या यशाचं श्रेयही मी त्यांनाच देईन.
मीरा म्हणाली, " जेव्हा मी 'नजर' या चित्रपटातून माझ्या फिल्मी करिअरची सुरुवात केली तेव्हा मला राम गोपाल वर्मा, मणिरत्नम, सुभाष घई यांसारख्या अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांकडून ऑफर आल्या, ज्यांना माझ्यासोबत काम करायचं होतं. पण महेश भट्ट यांना मी त्यांच्याशिवाय इतर कुणासोबत काम करावं असं वाटत नव्हतं. एका रात्रीत मी सुभाष घईंना भेटले. हे मी महेशजींना सांगितल्यावर ते खूप संतापले, माझ्यावर ओरडले आणि दोन-तीन वेळा मला कानाशिलातही लगावली.
आधी मुलगी मग स्पेशल म्हणायचे
मीरा पुढे म्हणाली, "मला माहित नाही का? ते खूप विचित्र गोष्टी बोलायचे. ते मला सांगायचे की तू माझ्यासाठी पूजासारखी आहेस. तुझ्यात आणि तिच्यात मला काही फरक नाही. आणि मग काही वेळाने म्हणायचे की, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू माझ्यासाठी खूप खास आहेस. त्यांना माझ्याकडून काय हवं होतं हे सांगणं फार कठीण आहे.
मीरा म्हणाली, ''एकदा आमची भांडणं झाली तेव्हा त्यांनी माझी माफी मागितली. त्यानंतर महेशने मला सांगितलं की, मी आता तुझी समस्या हाताळू शकत नाही, तू परत पाकिस्तानला गेलीस तर बरं होईल. मी गेले. पण मला परत यायचे असताना त्यांनी मला भारतात येऊ दिलं नाही. आता माझ्यासाठी बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची कोणतीही आशा उरली नव्हती. त्यांनी माझे सर्व मार्ग रोखले. मी खूप अस्वस्थ होते, माझी काय चूक होती ते मी स्वतःला सांगायचे. महेशजींना मी आजपर्यंत समजून घेऊ शकले नाही.