मुंबई : हिंदी चित्रपट विश्वात आजवर विविध विषयांवर भाष्य करणारे चित्रपट साकारण्यात आले आहेत. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर नांगी टाकणार असं वाटत असतातनाच तगडी स्टारकास्ट आणि त्याच तोडीचे कलाकार यांच्या बळावर या चित्रपटांना प्रेक्षकांची आणि समीक्षकांचीही चांगली पसंती मिळाली. या चित्रपटांच्या यादीतीलच एक नाव म्हणजे 'गँग्स ऑफ वासेपूर'. जवळपास सात वर्षांपूर्वी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याचा पहिला आणि दुसरा भाग प्रेक्षकांच्या विशेष पसंतीसही उतरला. पण, हाच चित्रपट अनुराग कश्यपसाठी मात्र अडचणीचा विषय ठरला. खुद्द अनुरागच हे म्हणत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी 'गँग्स ऑफ वासेपूर'ला सात वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने अनुरागने ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट लिहिली. ज्यामध्ये त्याने या चित्रपटाला सात वर्षे पूर्ण होण्यची माहिती दिली. पण, त्या ट्विटमध्ये आपणच आपल्या आयुष्याला कशा प्रकारे अडचणीत टाकलं होतं हेसुद्धा त्याने लिहिलं. 


'बरोबर सात वर्षांपूर्वी माझं आयुष्य बरबाद झालं. तेव्हापासून माझ्याकडून अशाच प्रकारचे चित्रपट साकारले जावेत असंच सर्वांना वाटू लागलं. मी मात्र या साऱ्यापासून, या अपेक्षांपासून दूर राहण्याचा अपयशी प्रयत्न करत होतो. असो.... आता मी आशा करतो की २०१९ च्या अखेरीस ही साडेसाती संपेल', असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं. 


खऱ्या आयुष्यातील प्रसंगांवर भाष्य करणाऱ्या 'गँग्स ऑफ वासेपूर'ला मिळालेली लोकप्रियता पाहता खरंतर अनुरागसाठी अत्यंत चांगली बाब आहे. पण, एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती साकारण्याकडेच त्याचा कायम कल राहिला आहे. त्यामुळे या अपेक्षांपलीकडे जाऊन काहीतरी वेगळं करण्याचा त्याचा मनसुबा यशस्वी होतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.