मुंबई : कलावंत होणं आणि कलावंताचं मन असणं ही काही साधीसोपी गोष्ट नाही. असं म्हणतात की, एका कलाकाराचं महत्त्वं दुसऱ्या कालकाराच कळतं. किंबहुना ते खरंही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच भारतीय संगीतक्षेत्रातील एक मोठं नाव, एक दिग्गज व्यक्तीमत्त्वं जगाचा निरोप घेऊन गेलं. हे व्यक्तीमत्त्वं होतं, पंडित शिवकुमार शर्मा यांचं. वयाच्या 84 व्या वर्षी मुंबईतील पाली हिल स्थित निवासस्थानी शर्मा यांचं कार्डिअॅक अरेस्टनं निधन झालं. (Pandit Shivkumar Sharma death)


11 मे रोजी त्यांच्यावर कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शर्मा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली. यातल्याच एका कलाकारानं सर्वजण माघारी फिरल्यावरही तिथेच थांबत शर्मा यांना शेवटचं न्याहाळलं. (Pandit Shivkumar Sharma ustad zakir hussain friendship )


ही व्यक्ती म्हणजे विश्वविख्यात तबला वादक, उस्ताद झाकिर हुसैन. सोशल मीडियावर सध्या त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, जिथं ते शर्मा यांच्या जळत्या चितेकडे एकटक पाहताना दिसत आहेत.



कैक दशकांची मैत्री, त्यातही एकत्र मिळून गाजवलेले कार्यक्रम आणि एकत्रत मिळवलेली प्रेक्षकांची दाद हे सर्वकाही तिथंच थांबलं होतं... एक नातं तिथेच संपलं होतं... कारण, एका मित्रानं  दुसऱ्याची साथ सोडली होती; असंच काहीसं हुसैन यांचा हा फोटो सांगून गेला. 


साऱ्या देशानं हा फोटो पाहिला आणि प्रत्येकाच्याच मनात कालवाकालव झाली. अनेक कलाप्रेमींच्या अश्रूंचा बांध फुटला. कारण, आजच्या काळात कुठे पाहायला मिळतात इतकी घट्ट नाती... ज्यांचा रक्ताचा संबंध नसला तरी एका अबोल बंधनात ती कायमची बांधली जातात.