मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीला दर्जेदार सिनेमा देऊन प्रेक्षकांना याड लावणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. नागराजने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी इतिहास रचला आहे. त्याच्या सैराट या चित्रपटाने तर १०० कोटींचा आकडा देखील पार केला. राष्ट्रीय पुरस्कार विजेता असलेला नागराज याची एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ट चित्रपटांसोबतच नागराजने तितक्याच उत्तम शॉर्टफिल्म्स देखील बनवल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या ३ शॉर्टफिल्म्स झी टॉकीज पहिल्यांदाच वाहिनीवर प्रसारित करणार आहे. येत्या रविवारी १९ जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता नागराजच्या शॉर्टफिल्म्स 'नागराजचा पिटारा' मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतील. नागराज यांच्या या पिटाऱ्यात 'पावसाचा निबंध', 'बिबट्या - द लेपर्ड' आणि 'पायवाट' या तीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस येतील. 'पावसाचा निबंध' हि शॉर्टफिल्म नागराज यांनी दिग्दर्शित केली आहे. जेव्हा नागराज फॅन्ड्री या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते तेव्हा पावसामुळे चित्रीकरण थांबवावे लागले होते. त्यावेळी नागराजला आपल्या बालपणातील एक आठवण झाली आणि त्यातूनच या शॉर्टफिल्मची कथा त्याला मिळाली.


कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये सिलेक्ट झालेली बिबट्या हि शॉर्टफिल्म नागराज यांनी प्रस्तुत केली असून या शॉर्टफिल्मची कथा एका बिबट्या शिरलेल्या गावावर आधारित आहे. बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी संपूर्ण गावकरी हे घरीच असताना एक मुलगी हरवते आणि तिला शोधण्यासाठी स्वतःचा जीव मुठीत धरून गावकरी घराबाहेर पडतात. त्या बिबट्याला पकडण्यासाठी गावकरी काय करतात हे या कथेमध्ये दर्शवलं आहे.


पायवाट हि शॉर्टफिल्म देखील नागराज यांची प्रस्तुती असून हि कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. या लघुपटाला नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला. या लघुपटाची कथा एका गावातील मुलीवर आधारित आहे जी रोज खूप मोठं अंतर पार करत शाळेत चालत जाते.



झी टॉकीजने या तिन्ही शॉर्टफिल्म्स सादर करून प्रेक्षकांचा रविवारचा मनोरंजनाचा बेत बनवला आहे. त्यामुळे पाहायला विसरू नका 'नागराजचा पिटारा' रविवार १९ जुलै दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त झी टॉकीजवर.