मुंबई : झी युवावरील अंजली ही मालिका एक तरुण आणि हुशार डॉक्टर अंजली आणि तिच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाभोवती फिरते. या मालिकेतून घराघरात पोहोचलेली डॉ. अंजली म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सुरुची अडारकर जशी छोट्या पडद्यावर पेशंट्सची काळजी करते तशीच ती खऱ्या आयुष्यात देखील माणसांची आणि पशुपक्षांची काळजी करते. उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यांची लाही लाही होत असताना पशुपक्षांना होणाऱ्या त्रासाकडे मात्र आपण फारसं लक्ष देत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाणी जे जीवन आहे असं आपण म्हणतो ते अगदी खरं आहे आणि या रखरखत्या उन्हात अनेक पक्षी पाण्याविना मरतात. पण अनेक लोक या पशु पक्षांची काळजी घेण्यासाठी पुढे सरसावतात आणि त्यात कलाकारांचा देखील तितकाच सहभाग असतो. सुरुची आडारकर देखील तिच्या चाहत्यांना या पक्षांसाठी घराच्या खिडकीत, बालकनीत किंवा गच्चीवर पाणी ठेवण्याचे आवाहन करत आहे. हे आवाहन सुरुचीने तिच्या सोशल मीडियावर केले आहे आणि त्याच सोबत तिच्या फॉलोवर्सकडे या ही पेक्षा काही उत्तम उपाय असतील तर त्याबद्दल विचारले आहे. छोट्या पडद्यावरील तिच्या डॉ अंजली या व्यक्तिरेखेप्रमाणेच सुरुची या मुक्या पक्षांच्या काळजीपोटी सर्वांना मदतीचा हात पुढे करण्याची विनंती करतेय हे उल्लेखनीय आहे. 


तिच्या या पुढाकाराबद्दल बोलताना सुरुची म्हणाली, "मला स्वतःला पर्यावरणासाठी काही करायची खूप इच्छा आणि आवड आहे. पशुपक्षांसाठी काहीतरी करण्यासाठी आपल्याला वेगळा वेळ काढण्याची गरज नाही आहे. आजकाल वस्तू ऑनलाईन मिळतात, त्यातून आपण एक बर्ड फीडर, बर्डहाऊस विकत घेऊन त्यात त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवू शकतो. मी स्वतः एका मातीच्या भांड्यात पक्षांसाठी पाणी ठेवते आणि ते भांड रोज साफ करून त्यातील पाणी बदलते जेणेकरून पक्षांना कुठलाही त्रास होणार नाही. आपण सर्वांनी पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे तरच आपण पुढच्या पिढीला चांगले पर्यावरण आणि भविष्य देऊ शकतो"