या ५ उपायांनी मिळवा रागावर नियंत्रण!
राग हा घातक असतो. रागात असताना आपले स्वतःवर नियंत्रण राहत नाही.
मुंबई : राग हा घातक असतो. रागात असताना आपले स्वतःवर नियंत्रण राहत नाही. काहींना तर अगदी लगेच राग येतो तर काहींना उशिरा येतो. पण राग सर्वांनाच येतो. पण रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमके काय करावे ते समजत नाही. तर रागावर नियंत्रण ठेवण्याचे हे काही सोपे मार्ग.
तज्ञांचे म्हणणे आहे की, राग हा सहनशीलता संपल्याने, चीडचीडेपणामुळे येतो. त्याचा परिणाम आपल्या शारीरिक तसंच मानसिक आरोग्यावर होतो. हा कोणताही मोठा रोग किंवा आजार नाही. पण त्यासाठी तुम्हाला आत्म संयम राखता यायला हवा. पण तो साध्य करणे तुम्हाला जमत नसल्यास हे उपाय करुन बघा.
राग येण्याचे कारण जाणून घ्या
प्रत्येकाला राग येण्याचे काही ना काही कारण असते. कामाचा दबाव, कोटुंबिक समस्या ही राग येण्याची कारण असू शकतात. तुमचे राग येण्याचे नेमके कारण शोधा. उदा. घरातील काम हे राग येण्याचे कारण असल्यास कामाचा प्राधान्यक्रम ठरवा आणि त्यानुसार काम करा. घरातील कामे प्रत्येक सदस्याने वाटून घ्यावीत. गरजेपेक्षा अधिक कामाचे ओझे स्वतःवर लादू नका.
रिलॅक्सेशन थेरपी
रागावर नियंत्रण आणण्याचा सोपा मार्ग म्हणजे दीर्घ आणि खोलवर श्वास घ्या. असे १० वेळा करा. त्यामुळे तुमचे मन शांत होते.
हे तंत्रही फायदेशीर
खुर्चीवर बसा किंवा जमिनीवर झोपा. तुमच्या पोटाच्या होणाऱ्या हालचालीकडे ३-५ मिनिटे लक्ष द्या. त्यावेळेस दीर्घ श्वास घ्या.
राग आलेल्या व्यक्तीला एकटे सोडू नका
रागात लोक अधिक हिंसक होतात. अशा स्थितीत त्या व्यक्तीला जे करायचे ते करु द्यावे किंवा त्याला एकटे सोडावे, असे म्हटले जाते. मात्र रिसर्चनुसार, असे केल्याने त्या व्यक्तीला अधिक राग येऊ शकतो.
अँगर मॅनेजमेंट शिका
अनावर होणारा राग येत असल्यास अँगर मॅनेजमेंट शिका. यात काही रिलॅक्सेशन एक्सरसाईजही शिकवले जातात.