ब्रेन डेड घोषित केलेल्या मानवाला लावली डुकराची किडनी; महिना उलटल्यानंतरही रूग्ण जिवंत
न्यूयॉर्कमध्ये एका 57 वर्षीय व्यक्तीला चक्क डुकराची किडनी लावण्यात आली आहे.
Pig Kidney Transplant In Human : तुम्ही अवयव दानाबद्दल ऐकलं असेल. एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीला किडनी देऊन त्याचा जीव वाचवल्याची अनेक उदाहरणं पाहिली असतील. मात्र कधी माणसाला प्राण्यांची किडनी लावल्याचं ऐकलंय का? नाही ना...जगात अशी एक व्यक्ती आहे जिला चक्क डुकराची किडनी लावण्यात आली आहे.
माणसाला आता प्राण्यांमुळे जिवनदान मिळणार
माणसाला आता प्राण्यांमुळे जिवनदान मिळणारंय. कारण एका व्यक्तीला चक्क डुकराची किडनी लावण्यात आलीय. कदाचित हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे अगदी खरंय...न्यूयॉर्कमध्ये एका 57 वर्षीय व्यक्तीवर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलीय. मॉरिस मो मिलर असं या व्यक्तीचं नाव आहे. डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केलं होतं. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. व्हेंटिलेटवर असलेल्या मॉरिस यांच्या जगण्याची आशा जवळपास संपल्यात जमा होती. किडनी ट्रान्सप्लांटसाठी किडनी उपलब्ध नसल्यानं डॉक्टरांनी डुकराची किडनी लावण्याचा निर्णय घेतला. शर्थीचे प्रयत्न करत डॉक्टरांनी यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. 14 जुलैला ही शस्त्रक्रिया करण्यात आली. किडनी प्रत्यारोपणाला एक महिना उलटल्यानंतरही हा रूग्ण जिवंत आहे. विशेष म्हणजे त्याला लावण्यात आलेली किडनी योग्यरित्या काम करत असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय.
प्रत्येक रूग्णाला किडनी मिळतेच असं नाही. किडनी न मिळाल्यानं मरण पावणा-या रूग्णांची संख्या खूप मोठी आहे. मला विश्वास आहे माणसाला इतर कोणत्याही प्राण्याची किडनी लावण्याचा प्रयोग निश्चितच धाडसी प्रयोग आहे. मी आजवर शेकडो शस्त्रक्रिया केल्या आहे. मात्र आतापर्यंत माणसाला माणसाचीच किडनी लावत आलोय. आता हे प्रत्यारोपण यशस्वी झालं तर भविष्यात निश्चितच त्याचा खूप मोठा फायदा होईल असे सर्जन डॉ. रॉबर्ट मोंटगेमरी म्हणाले.
नॅशनल किडनी फाऊंडेशनच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत 4 कोटी लोक किडनीच्या विकारानं त्रस्त आहेत. किडनी अभावी दररोज 17 लोकांचा मृत्यू होतो. डुकराच्या किडनीचा प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांनी त्यात मानवी पेशी टाकण्यात आल्या जेणेकरून ती किडनी माणसाच्या शरीरात मॅच होईल.
आता ज्या रूग्णाला ही किडनी लावण्यात आलीय त्याच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. 14 जुलैच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर ही किडनी योग्यरित्या काम करतेय. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला तर वैद्यकीय क्षेत्रात निश्चितच ही मोठी क्रांती ठरेल.