उन्हाळ्यात फीट राहण्यासाठी रनिंग करण्याचा विचार करताय? या गोष्टी ध्यानात ठेवा
उन्हाळ्यात तुम्ही रनिंग करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही बाबींकडे लक्ष द्यावं लागणार आहे.
मुंबई : फीट राहण्यासाठी धावणं म्हणजेच रनिंग हा उत्तम पर्याय मानला जातो. हे तुमच्या पायांप्रमाणे कॅलरीज देखील बर्न करण्यास मदत करतं. रनिंग हा असा व्यायाम आहे, ज्यासाठी तुम्हाला वेगळं फिटनेस मशिन खरेदी करण्याची गरज नाही. केवळ रनिंग केल्याने तुमचं संपूर्ण शरीर फीट राहण्यास मदत होते.
जर तुम्ही यापूर्वी कधीही रनिंग केलं नसेल आणि आता तुम्ही रनिंग करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही बाबींकडे लक्ष द्यावं लागणार आहे. कारण सध्या तापमान खूप वाढू लागलंय आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने धावत असाल तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात धावताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी ते सांगणार आहोत.
वेळ निश्चित करा
सहसा लोक रनिंगसाठी आपल्या सोयीनुसार वेळ निवडतात. पण उन्हाळ्यात योग्य वेळी धावणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. साधारणपणे, या ऋतूमध्ये, दिवस उजाडण्यापूर्वी सकाळी 5-7 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 नंतर धावणं योग्य मानले जाते.
दररोज रनिंग करू नका
धावताना तुमच्या शरीराचं तापमान प्रचंड वाढतं आणि जर तुम्ही पहिल्यांदाच धावत असाल तर उन्हाळ्याच्या दिवसात दररोज धावणं योग्य नाही. आठवड्यातून चारपेक्षा जास्त वेळा धावू नका. इतर दिवशी तुम्ही सौम्य व्यायाम करा. ओव्हर रनिंग केल्याने केवळ स्नायू दुखवण्यासोबत दुखापत आणि इतर समस्यांची शक्यताही वाढते.
पाणी कमी पिऊ नका
जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांत रनिंग करत असाल तर तुम्ही हायड्रेट राहणंही गरजेचं आहे. हीटस्ट्रोक आणि डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी भरूपूर प्रमाणात पाण्याचं सेवन केलं पाहिजे. तसंच रनिंग करताना तुमच्यासोबत पाण्याची बॉटल ठेवत जा.