Corona JN.1 Variant अधिक घातक? त्याची लक्षणं काय? तज्ज्ञ काय म्हणतात?
Corona JN1 Symptoms: मागील काही दिवसांमध्ये देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. सोमवारी एकट्या केरळमध्ये 111 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
Corona JN1 Symptoms: केरळमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना विषाणूच्या जेएन 1 या अतिसंसर्गजन्य व्हेरिएंटचा पहिला रुग्णही आढळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालायाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दक्षतेचा इशारा दिला आहे. रविवारी कोरोनामुळे देशात एकूण जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच आता नव्या जेएन 1 व्हेरिएंटचा रुग्ण भारतात आढळून आला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव सुशांत पंत यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सोमवारी पाठवलेल्या पत्रामध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या उपप्रकारांचा उल्लेख करताना यामुळेच संसर्ग वाढत असल्याचं म्हटलं.
याच व्हेरिएंटमुळे परदेशात रुग्णसंख्या वाढली
जेनेटीक मॅपिंगचे महाराष्ट्रातील समन्वयक असलेल्या डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी, "कोरोना विषाणूचा उपप्रकार असलेला जेएन 1 हा केरळमध्ये आढळून आला आहे. अमेरिकेसहीत युरोपमध्ये या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत हा व्हेरिएंट आढळून आलेला नाही," असं स्पष्ट केलं आहे.
लक्षणं काय?
कोरोनाचा जेएन 1 व्हेरिएंट रोगप्रतिकारशक्तीला चकवा देण्यासाठी ओळखला जातो. मागील व्हेरिएंटसारखीच याची लक्षणं आहेत. यामध्ये ताप येणं, नाक वाहणं, डोकेदुखी, घशात खवखवणं, पोटदुखी यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. जेएन 1 या सब व्हेरिएंटची लागण झाल्यास गॅस्ट्रोइंटेस्टाइनल म्हणजेच पचनासंदर्भातील समस्या अधिक वाढतात. मात्र अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत जेएन 1 अधिक घातक असल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत असं अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि नियमन केंद्राने स्पष्ट केलं आहे. जेएन 1 व्हेरिएंट हा फार धोकादायक असला तरी त्यामुळे प्रकृती अचानक खालवण्याची शक्यता कमी असल्याने थेट रुग्णालयात दाखल करावं लागण्याची वेळ येणार नाही असंही सांगितलं जात आहे.
आधीच्या लसीकरणाचा होणार फायदा
कोरोनासंदर्भातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण केल्याने वेगवेगळ्या व्हेरिएंटशी संघर्ष करण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती सक्षम आहे. जेएन 1 चा व्हेरिएंट पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत आढळून आला होता. चीनमध्ये 15 डिसेंबर रोजी जेएन 1 चे एकूण 7 रुग्ण आढळून आले. यानंतरच या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.
केरळमधील महिलेत आढळलेला हा व्हेरिएंट
केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील काराकुलम येथील एका 78 वर्षीय महिलेमध्ये जेएन 1 चा व्हेरिएंट आढळून आला होता. जेएन 1 ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट असलेल्या पिरोलापासूनच तयार झालेला आहे. यामध्ये स्पाइक प्रोटीन आहे. या स्पाइक प्रोटीनुळे शरीरामध्ये या संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने होते. स्पाइक प्रोटीनमुळेच रोगप्रतिकारशक्तीला हा जेएन 1 व्हेरिएंट चकवा देऊ शकतो. स्पाइक प्रोटीनमुळेच या विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होण्यासही मदत होते. त्यामुळेच जेएन 1 वरील इलाज करताना दिली जाणारी औषधं ही या स्पाइक प्रोटीनवर परिणाम करणारी असतात.