मुंबई : पित्ताचा त्रास हा अपचन, अवेळी खाणं, झोपणं अशा सवयींमुळे अधिक वाढतो. पित्ताच्या त्रासामध्ये काहीजणांना चक्कर येणे, उलट्या होणं असा त्रास होतो. त्यामुळे शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी नेमकं काय खावं? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. उलटीच्या भीतीने अनेकजण काहीच न खाण्याची चूक करतात. प्रामुख्याने फळांच्या बाबतीत अनेकांच्या मनात हे समज गैरसमज आहेत. त्यामुळे तुमच्या मनातील या गोष्टी दूर करण्यासाठी हा सल्ला नक्की वाचा.  


पित्त आणि आंबट फळं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पित्ताचा त्रास होत असल्यास अनेकजण आंबट फळं टाळतात. तुम्हांला थेट फळ खाणं शक्य नसल्यास त्याचा रस प्यावा. फ्रूटज्यूसमधील साखर शरीराला उर्जा देते. सकाळी दिवसाची सुरूवात अशा फळांच्या रसाने करणं फायदेशीर ठरू शकतं. मात्र आंबट फळांचा रस रिकाम्यापोटी घेऊ नका. दोन जेवणाच्या दरम्यान भूक लागल्यास तुम्ही ज्यूस पिऊ शकता. 


आंबट फळांचे आरोग्यदायी फायदे -  


आंबट फळं आरोग्यदायी आहेत. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. 


गरोदर स्त्रीयांमध्ये गर्भाच्या वाढीसाठी त्याची मदत होते. 


लिंबू, संत्र, मोसंबीसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. 


आंबट फळांमध्ये फॉलिक अ‍ॅसिड अधिक असल्याने गर्भाचा विकास होण्यास मदत होते. व्हिटॅमिन सीमध्ये उत्तम प्रतीचे अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक असतात. यामुळे फ्री रॅडिकल्सचा धोका कमी होण्यास मदत होते. 


त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी आंबट फळांचा आहारात समावेश करणं अधिक फायदेशीर आहे. 


व्हिटॅमिन सी घटक शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारतात. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात फ्लू, सर्दीसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. 


गरोदरपणाच्या काळात किवी, संत्र, लिंबू खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे गरोदर स्त्रियांमध्ये अ‍ॅलर्जी कमी होण्यास मदत होते.