फ्रान्स : फ्रान्समध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. दर दिवसागणिक या ठिकाणी 2 लाखांपेक्षा अधिक प्रकरणांची नोंद होताना दिसतेय. कोरोनाची महामारी सुरु झाल्यानंतर प्रथमच फ्रान्समध्ये कोरोनाचा विस्फोट पहायला मिळाला आहे. सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे, बुधवारी 24 तासांमध्ये 208,000 कोरोनाचे नवे रूग्ण आढळून आल्याची माहिती आहे. ही आकडेवारी संपूर्ण युरोपात अधिक आहे.


प्रत्येक सेकंदाला 2 जणं कोरोना पॉझिटीव्ह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिवियर वेरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी फ्रान्समध्ये प्रत्येक दिवसाला 180,000 प्रकरणांची नोंद होत होती. मात्र आता परिस्थिती फार बिकट झाली आहे. या ठिकाणी प्रत्येक सेकंदाला 2 जणं पॉझिटीव्ह असल्याची नोंद करण्यात आली आहे. 


पॅरीसमध्ये ज्या रूग्णांना इंटेसिव्ह केअरमध्ये ठेवण्यात आलं आहे त्यापैकी जवळपास 70 टक्के व्यक्तींनी कोरोनाची लस घेतलेली नाही. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे रूग्णालयातील परिस्थिती चिंताजनक आहे. तर ओमायक्रॉनबाबत अजून काही सांगू शकत नाही, असंही ओलिवियर वेरन यांनी सांगितलं आहे.


ओलिवियर वेरन पुढे म्हणाले, परिस्थिती बिघडत असून मी याला कोरोनाची त्सुनामी असं म्हणेन. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या पाहिली तर तो नक्कीच चिंतेचा विषय आहे. जवळपास 10 टक्के जनता कोरोना संक्रमित असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे. 


ज्या व्यक्तींनी बूस्टर डोस घेतला नाही अशांनी अधिक काळजी घ्यावी. कारण अशा व्यक्तींना अधिक कोरोना होण्याचा धोका असल्याचं वेरन यांनी सांगितलं आहे.