न्यूयॉर्क : कोरोना महामारीवर मात करण्यासाठी कोरोना लस हा सध्या उपाय आहे. कोरोनाची लस जगातील विविध देशांमध्ये लोकांना देण्यात येतेय. पण अजूनही लोकांच्या मनात कुठे ना कुठे लसीसंदर्भात शंका दिसून येतात. तर काही जण इतर कारणांमुळे लस घेत नसल्याचं दिसून आलंय. अमेरिकेतूनही असंच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे लस घेतली नाही म्हणून 1400 लोकांना कामावरून काढून टाकलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरण न्यूयॉर्क राज्यातील सर्वात मोठे आरोग्य सेवा देणाऱ्या नॉर्थवेल हेल्थशी संबंधित आहे. कोरोना लस घेण्यास नकार देणाऱ्या आपल्या 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. हेल्थकेअरचे प्रवक्ते जो कॅम्प यांनी ही बातमी सर्वांसमोर आणली आहे.


नॉर्थवेल हेल्थमध्ये 76 हजार कर्मचारी करतात काम


न्यूयॉर्कमधील नॉर्थवेल हेल्थमध्ये सुमारे 76 हजार कर्मचारी काम करतात. त्यापैकी 1400 जणांना काढून टाकण्यात आलं आहे. इतर सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली आहे.


न्यूयॉर्कमध्ये सध्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हे फक्त गेल्या आठवड्यात केलं गेलं आहे. कॅलिफोर्नियासह इतर काही राज्यांनीही हे नियम करण्यात आले आहेत.


नॉर्थवेल हेल्थच्या या कर्मचाऱ्यांनी लस घेणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र असं करणं फार महागात पडलं आहे. कारण त्या बदल्यात त्यांना नोकरी गमवावी लागली. कॅम्प म्हणाले की, आमचं ध्येय कर्मचाऱ्यांना काढून टाकणं नव्हतं, तर सर्वांनी कोरोना लस मिळावी असं होतं.