मुंबई  :  हिवाळ्यात भाज्या मुबलक प्रमाणात येतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलाव, पावभाजी, कोल्हापुरी व्हेज अशा मिक्स भाज्यांचे प्रकार सर्रास बनवले जातात. अशा मिक्स भाज्यांमधील एक म्हणजे क्वालीलीफ्लॉवर ! पण अनेकजण त्याची हिरवी पानं फेकून देतात. यामधून कॅलशियमचा पुरवठा होतो. आहारतज्ञांच्या मते फ्लॉवरच्या पानांमधून उच्च दर्जाचे मुबलक प्रमाणात कॅल्शियमचा पुरवठा होतो. 


उत्तम पावरहाऊस –


लहान मुलांवर करण्यात आलेल्या प्रयोगानुसार,  फ्लावरच्या पानांचा त्यांच्या आहारात समावेश केल्याने हिमोग्लोबीन, उंची, वजन आणि  आवश्यक पोषणद्रव्यांचे प्रमाण वाढले.


फ्लावरच्या पानांमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि फायबरचा मुबलक साठा असतो. यामुळे हाडं मजबूत होतात, रोगप्रतिकारशक्ती सुधारते, पचनमार्गाचे कार्य सुधारते. सुमारे 100 ग्रॅम पानांमधून 600 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते.


दूध व दुग्धजन्य पदर्थातून मिळणार्‍या लॅक्टोजचा अ‍ॅलर्जीमुळे तुम्ही दूध पिणे टाळत असल्यास फ्लावरची पानं हा शरीराला कॅल्शियम पुरवण्याचा उत्तम पर्याय आहे.


कशी निवडाल फ्लावरची पानं  ? 


ताजी आणि हिरवी  कोवळी फ्लावरची पानं निवडा. पिवळ्या पानांपेक्षा हिरव्या पानांमध्ये अधिक पोषणद्रव्य आढळतात.  तसेच पानं वापरण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्यावीत.


कसा कराल आहारात वापर ? 


आहारतज्ञांच्यामते, फ्लावरची कोवळी पानं क्रन्ची आणि हलक्या चवीची असतात. त्यामुळे त्यांचा अनेक पदार्थांमध्ये वापर केला जाऊ शकतो. पराठ्यामध्ये फ्लावरचा वापर  केला जाऊ शकतो. मुगाची किंवा तुरीची डाळ व पालक, मेथी आणि फ्लावरची पानं मिसळून तुम्ही ‘हरयाली दाल’ हा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ करू शकता. 


सॅलॅडमध्ये इतर फळभाज्यांच्या सोबत फ्लावरची पानंदेखील वापरता येऊ शकतील. वेळी अवेळी  लागणार्‍या भूकेवर मात करण्यासाठी थोड्याशा बटरवर  पानं हलकीच भाजून त्यावर भाजलेले तीळ, मीठ, मिरपूड घालून झटपट सॅलॅड बनवू शकता. परंतू अति शिजवून त्यामधील पोषणद्रव्य नष्ट  होणार नाहीत याची काळजी घ्या.