मुंबई : लहान मुलांमध्ये आढळणारी हिंसा, लैंगिक दुष्कृत्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग आणि मानसिक विकृती दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येतंय.


कुठून येते हिंसा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक ठिकाणी अत्यंत गंभीर आणि हीन गुन्ह्यांत लहानग्यांच्या सहभागाची वाढती प्रकरणं चर्चेचा विषय ठरत आहेत. इतकी क्रूर कृत्य ही मुलं कुठून शिकतात?


निरागसता हरवतेय...


डॉक्टरांशी या विषयी चर्चा केली असता, लहानग्यांतली निरागसता हरवत चालल्याविषयी तेही चिंतेत असल्याचं दिसून येतंय. आपण केलेली एखादी मागणी पूर्ण होत नाही हे पाहून ते आपला राग आवरू शकत नाहीत... अशी मुलं छोट्या छोट्या कारणांनीही निराशाग्रस्त होऊ शकतात.


आभासी दुनिया


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मोबाईल आणि इंटरनेटनं चिमुरड्यांनाही एका वेगळ्याच आभासी दुनियेचा मार्ग मोकळा करून दिलाय. हा मार्ग वरवर चांगला दिसत असला तरी त्याचे दुष्परिणामही तितकेच भयंकर आहेत. या आभासी दुनियेत अशीही काही ठिकाणं आहेत जिथं चिमुरड्यांना प्रवेश दिला जाऊ नये... अनेक अश्लील आणि हिंसक व्हिडिओ, फोटो आणि इतर माध्यमांतून या गोष्टी लहानग्यांच्या हाती पडत आहे... कुतुहलता म्हणून जरी ते या गोष्टी पाहत असले तरी कदाचित त्यांना या गोष्टी समजण्याचं हे वय नव्हे...


वेळ आणि संवादाची गरज 


आजच्या युगात जिथं आई वडील दोघंही नोकरीनिमित्तानं घराबाहेर पडतात तिथं चिमुरड्यांना त्यांचा सहवास मिळू शकत नाही... आईकडून जेवढा वेळ अपेक्षित असतो तेवढाच मुलांना वडिलांचाही सहवास लाभणं गरजेचं असतं. आपल्या पालकांसोबत त्यांना आपण सुरक्षित असल्याची त्यांना खात्री हवी... घरात संवाद हवा... त्यामुळे भावनात्मकरित्याही ते पालकांशी जोडलेले असतात.


आपल्या मुलांची निरागसता, त्यांचं बालपण जपलं जाणं हे तुमच्यासाठीही महत्त्वाचं असेल... पण, त्यासाठी मुलांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन हे प्रश्न सुटणार नाहीत... यासाठी त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे.