सुट्टीच्या दिवशीही घरी लोळत पडत असाल तर...
सोशल जेट लॅग म्हणजे काय? सोशल जेट लॅगची लक्षणं काय? कसा टाळाल सोशल जेट लॅग?
मुंबई : आजुबाजुच्या धावत्या - पळत्या वातावरणात आपला आठवडा सहज निघून जातो... आणि उरतो तो सुट्टीचा दिवस... अर्थातच हा दिवस आठवड्याची उरलेली कामं, कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी वापरावा असा अनेकांचा बेत असतो... पण, काही जण मात्र आपला सुट्टीचा संपूर्ण दिवस फक्त लोळत काढतात... तुमचंही शेड्युल असंच असेल तर थांबा... आणि थोडा विचार करा... ही सवय तुम्हाला भलतीच महाग पडू शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सुट्टीच्या दिवशी प्रमाणापेक्षा अधिक वेळ झोप काढल्यानं हृदयविकाराचा धोका बळावतो.
विमान प्रवासानंतर येणारा थकवा अर्थात 'जेट लॅग' हा शब्द तुम्ही एव्हाना ऐकलाच असेल पण, आपण सध्या बोलतोय 'सोशल जेट लॅग'बद्दल... आठवड्यातून एखाद्याच दिवशी प्रचंड झोप काढल्यानं 'सोशल जेट लॅग'ची शक्यता वाढते.
सोशल जेट लॅग म्हणजे काय?
आता, सोशल जेट लॅग म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर आपल्या शरीराचं जैविक घड्याळ आणि आपल्या वास्तविक झोपेचं वेळापत्रक न जुळलं म्हणजे सोशल जेट लॅग... सोशल जेट लॅगचा संबंध थेट हृदयविकाराशी आहे.
नेहमीची पुरेशी झोप, प्रवास, काम, चालणं यांची शरीराला झालेली सवय एखाद्याच दिवशी मोडली तर ती शरीराला भारी पडू शकते.
अधिक वाचा :- ...म्हणून झोपण्यासाठी अंथरुणावर लवकर जावं
सोशल जेट लॅगची लक्षणं?
चिडचिड करणं, स्वभावात नकारात्मक बदल होणं, सतत थकवा जाणवणं किंवा आठवडाभर दिवसभर झोप जाणवणं असे सोशल जेट लॅगची काही लक्षणं आहेत.
अधिक वाचा :- रात्री झोपण्यापूर्वी संगीत ऐकल्याचा होतो 'हा' मोठा फायदा
मनालाही आराम द्याच...
यापेक्षा, आपल्या शरीराला आवश्यक असलेली झोप झाल्यानंतर उरलेला वेळ चित्रपट पाहणं, मित्रांसोबत गप्पा मारणं, फिरायला जाणं, नवीन गोष्टी शिकणं अशा कामांसाठी वापरणं योग्य ठरेल... यामुळे तुमच्या शरीरासोबतच तुमच्या मनालाही आराम मिळू शकतो.
सुट्टीच्या दिवशी व्यतिरिक्तही दररोज सात-आठ तास शांत झोप मिळेल याची काळजी घ्या. झोप ही आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. पण, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच... हे मात्र खरं...