मुलांच्या `या` टप्प्यामध्ये पालकांची मोठी जबाबदारी...जाणून घ्या कुठले आहेत `ते` टप्पे
जर आपण या टप्प्यांमध्ये मुलांकडे लक्ष दिलं तर मुलांचा उत्तम विकास होऊ शकतो.
मुंबई - आई-वडिल होणं यापेक्षा आयुष्यात अनमोल क्षण नसतो. या आनंदासोबत एका लहान मुलाला घडवण्याची जबाबदारी आपल्यावर येते. पालक बनणं सोपं नाही. आजकालची मुलं ही फार हुशार असतात. मुलं कधी मोठी होतात आपल्याला कळतं नाही. अनेक वेळा आपण हे वाक्य ऐकतो, 'अरे आताच तर जन्माला आला होता लगेचच किती मोठा झाला.' मुलांमध्ये शारीरिकदृष्ट्या बदल लवकर दिसून येतात. मात्र मुलांचा बौद्धिक विकासही तेवढ्यात महत्त्वाचा असतो. लहान मुलांच्या विकासाचे काही टप्पे असतात. जर आपण या टप्प्यांमध्ये मुलांकडे लक्ष दिलं तर मुलांचा उत्तम विकास होऊ शकतो. आपण मुलांच्या या 5 टप्प्यांमध्ये आईवडिलांची भूमिका का महत्त्वाची असते ते जाणून घेऊयात.
1. नवजात - नवजात बालक त्याचा जवळील वस्तू आणि काही विशिष्ट सुगंध ओळखू शकतात. असं म्हणतात या टप्प्यात बालक आपल्या आईचा स्पर्श, सुगंध ओळखतो. त्याला काही हवं असेल तर रडून ते सांगता. मात्र हा त्याचा विकासाचा महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे यावेळी आईने त्याचा प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवायला पाहिजे.
2. अर्भक - पहिल्या वर्षात बालकाची वाढ ही वेगाने होते. जर तुम्हाला हा विकास हळूहळू होत आहे असं जाणवलं तर त्या बालकाला डाऊन सिंड्रोम किंवा इतर काही अपंगत्वाचे लक्षण असू शकतात. साधारण 3 ते 6 महिन्यांत बाळ आपल्या डोक्याच्या हालचालीवर नियंत्रण मिळतो. तसंच तो हातही एकत्र हलवतो. तसंच साधारण 9 महिन्यांनतर बाळ वस्तू उचलू शकतो आणि गुडघ्यावर चालायला लागतो.
3. टॉडलर - या टप्प्यात लहान मुलं कोणाच्याही मदतीशिवाय चालायला फिरायला लागतं. या टप्प्यात तो पायऱ्या चढण्याचाही प्रयत्न करतो. या टप्प्यात बालकामध्ये अनेक कौशल्ये विकसित होतात. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार साधारण 18 ते 24 महिन्याचा बालकाचे ऑटिझमच्या लक्षणांसाठी तपासणी केली पाहिजे.
4. प्रीस्कूल - 3 ते 5 वयोगटातील चिमुरड्यामध्ये मोटर कौशल्यात सुधारणा होते. तो या वयात चेंडू टाकू शकतो, उडी मारु शकतो. या वयातील मुलांमध्ये सेरेब्रल पाल्सीची लक्षणे दिसू शकतात.
5. शालेय वय - या टप्प्यात 6 ते 12 वर्षातील मुलं जी शाळेत जातात. या वयातील मुलं ही आत्मनिर्भर आणि जबाबदार झालेली असतात. या टप्प्यातील मुलं आपल्या वयाच्या मुलांशी मैत्री करतात. या वयातील मुलांनी आपल्या वयातील मुलांसोबत जास्त जास्त राहिला पाहिजे. या वयातील मुलांमध्ये एखाद्या गोष्टीची भीती लवकर विकसित होते. या टप्प्यातील मुलांमध्ये एडीएचडीची चिन्हे जाणून घ्यायला पाहिजे.
खरं तर मुलांना पालकांची प्रत्येक टप्प्यात गरज असते. त्यांच्या विकासात पालकांचा खूप मोठा हात असतो. आपण एक पिढी घडवत असतो म्हणून पालकांनी चिंता न करता सतर्क राहून मुलांच्या विकासाकडे लक्ष द्या. त्यांच्यामध्ये होणारे बदल समजून घ्या.