सावधान! गर्भवती मातांना सर्वाधिक धोक्याचा ठरणारा झिका डोकं वर काढतोय
तीन शहरे झिका विषाणूच्या संसर्गाने ग्रासली आहेत.
मुंबई : देश सध्या कोरोना संसर्गाशी झुंज देतोय. तर अशा परिस्थितीत आता दुसरीकडे झिका विषाणूचा प्रसारही सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशातील तीन शहरे झिका विषाणूच्या संसर्गाने ग्रासली आहेत. यामध्ये कानपूर, कन्नौज आणि लखनऊचा समावेश आहे. कानपूरमध्ये झिका व्हायरसचे एकूण 123 रुग्ण आढळून आल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
कानपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नेपाल सिंग यांनी सांगितलं की, झिकाच्या 123 रुग्णांपैकी 37 जणांचा अहवाल आता निगेटिव्ह आला आहे. म्हणजे 37 लोक आता बरे झाले आहेत. त्याच वेळी 86 प्रकरणं अजून एक्टिव्ह असल्याची माहिती आहे. या सर्व रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
डॉ. सिंग यांनी पुढे सांगितलं की, सर्व्हिलंस टीमने 1,49,408 घरांमध्ये घरोघरी जाऊन तपासणी करण्याचं काम पूर्ण केलं आहे. सॅम्पलिंग टीमने आतापर्यंत 4,675 नमुने घेतले आहेत.
झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ज्या शहरांमध्ये झिकाची प्रकरणं आढळून येत आहेत. त्या ठिकाणी अधिक सावधगिरी बाळगली जातेय. यासह प्रशासनही सतर्क झालं आहे.
निष्काळजीपणा पडू शकतो महागात
झिका व्हायरसपासून वाचण्यासाठी खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक असल्याचं डॉक्टरांचे म्हणणं आहे. झिका विषाणू डासांमुळे पसरतो. हे धोकादायक आहे, परंतु योग्य वेळी उपचार करून स्थिती नियंत्रणात आणली जाऊ शकते. जेव्हा तुम्हाला झिका व्हायरसची लक्षणं जाणवतात तेव्हा निष्काळजी राहणं धोकादायक असू शकतं. त्यामुळे तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
झिका व्हायरसची लक्षणं?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ताप, पुरळ, स्नायू दुखणं, डोकेदुखी, उलट्या झाल्यास सतर्क राहा. ही झिका व्हायरसची लक्षणं असू शकतात. लक्षणं फ्लू सारखीच असतात. काहीवेळा त्याची लक्षणं दिसत नाहीत किंवा खूप सौम्य असतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गरोदर महिलांना अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.