Side Effects of Salt : कोणत्याही पदार्थामध्ये मीठ नसल्यास त्या पदार्थाची नेमकी चवच लक्षात येत नाही. अगदी चिमुटभर मीठही कोणत्याही पदार्थात मिसळताच ते कमाल करून जातं. पण, हेच मीठ जर वाजवीहून अधिक प्रमाणात पडलं तर मात्र अडचणी निर्माण करू शकतं. जाणून हैराण व्हाल, पण वैद्यकिय क्षेत्रामध्ये मीठाला 'हिडन किलर' असंही म्हटलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीठाला शरीरावर मारा करणार छुपा शत्रू यासाठी म्हटलं जातं, की त्याचा प्रभाव तातडीनं दिसण्यास सुरूवात होत नाही. पण, धीम्या गतीनं हेच मीठ शरीराचा घात करत असतं. मीठाच्या अतीसेवनामुळं हायपरटेन्शनची समस्या बळावते आणि यामुळं हृदयरोगांसह पक्षाघाताचाही धोका बळावतो. 


जागतिक आरोग्य संघटनेनं एका निरीक्षणपर अहवालात प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दर दिवशी 5 ग्रॅमहून कमी मीठाचं सेवन करण्याची सवय शरीरासाठी फायद्याची. भारत मात्र इथं इतर देशांच्या तुलनेत अपवाद ठरत असून, सरासरी प्रत्येक भारतीय दर दिवशी 8 ते 11 ग्रॅम इतक्या मीठाचं सेवन करतो. WHO च्या आकडेवारीनुसार हे प्रमाण घातक असून, त्यांच्या मानकांच्या तुलनेत ते 700 ते 100 टक्क्यांहून जास्त आहे. मीठाच्या अतीसेवनाचे दीर्घकालीन परिणाम म्हणजे रक्तदाब वाढून त्यानंतर त्याच्याशी संबंधीत शारीरिक व्याधींचा शरीराला बसणारा विळखा. 


मीठाच्या सेवनाचा इतका मोठा धोका? 


मीठाच्या अतीसेवनामुळं फक्त हृदयरोगच नव्हे, तर पोटाचा कर्करोग, हाडांचा ठिसूळपणा या आणि अशा व्याधीसुद्धा शरीरात घर करू लागतात. अभ्यासकांच्या मते जर प्रत्येक व्यक्तीनं त्यांच्या दैनंदिन आहारातून मीठाचं 1 ग्रॅम सेवन कमी केलं तर अशानं दरवर्षी 4000 हून अधिकजण हृदयरोग आणि पक्षाघातापासून बचावतात. 


हेसुद्धा वाचा : बावनकुळे, शेलार यांच्यातील भेटीचा सुपरहिरो ठरला टेबलावरील 'तो' कप; काय लिहिलंय पाहिलं? 


निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार दैनंदिन आहारातील चपाती, रेडी टू ईट फूड, जंक फूड, पिझ्झा, पनीर आणि सूप या पदार्थांमध्ये मीठाचं प्रमाण जास्त असून या पदार्थांच्या सेवनावेळी मीठाच्या वापरावर नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दैनंदिन आहारातून मीठाचं प्रमाण हळुहळू कमी केल्यास चव घेण्याची क्षमतासुद्धा त्यानुसार बदलते आणि परिणामी शरीराला कमी मीठाच्या सेवनाचीही सवय होते. 


(वरील माहिती उपलब्ध संदर्भांतून घेण्यात आली असून, झी 24तास याची खातरजमा करत नाही.)