Marathon Meetings Before CM Oath Ceremony : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली (Maharashtra Assembly Election 2024). मोठ्या मताधिक्यानं महायुतीच्या उमेदवारांना यश मिळालं आणि त्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल यावरून बऱ्याच चर्चा झाल्या. अनेक बैठका, भेटीगाठी आणि सल्लामसलतीची सत्रही पार पडली. या सर्व चर्चांदरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त सुत्रांचा हवाला देत प्रसिद्ध करण्यात आलं. पण, या साऱ्यामध्ये एक भेट मात्र भलतीच चर्चेत आली.
निमित्त ठरलं ते म्हणजे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी X च्या माध्यातून शेअर केलेला एक फोटो. शेलार यांनी शेअर केलेल्या या फोटोंमध्ये त्यांची आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाल्याचं पाहायला मिळालं. याच भेटीसंदर्भातील माहिती देताना, 'भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी ह्यांनी माझ्या कार्यालयात येऊन सदिच्छा भेट घेतली' असं शेलारांनी लिहीत तीन फोटो पोस्ट केले.
इथं या दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली असेल, याचा तपशील अद्याप समोर आला नसला तरीही या भेटीनंतर भलतीच चर्चा झाली ती म्हणजे दोन्ही नेत्यांसमोर असणाऱ्या टेबलावरील एका कपची. 'द फ्युचर इज हियर 2024-2032' असं या कपावर लिहिलं होतं. याचे नेमके संकेत काय? हाच प्रश्न आता राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी ह्यांनी माझ्या कार्यालयात येऊन सदिच्छा भेट घेतली.#AshishShelar pic.twitter.com/oRlEIZYblk
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 1, 2024
एकिकडे मुख्यमंत्रिपदी मराठा नेत्याचा चेहरा द्यायचा की ओबीसी नेत्याचा यावरून प्रचंड चर्चा सुरू असतानाच यादरम्यान आशिष शेलार यांचही नाव चर्चेत असल्यामुळं बावनकुळेंनी त्यांची भेट घेणं ही मोठी घडामोड समजली जात आहे. सत्तेत असणाऱ्यांव्यतिरिक्त केंद्रीय नेतृत्त्वाच्या निकटवर्तींयांपैकी एक अशीही शेलारांची ओळख असून, अमित शाह यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. शेलारांच्या टेबलावर असणारा कप कैक गोष्टी सुचवत आहे, त्यामुळं आता या नेत्यांची भेट खऱ्या अर्थानं कपनंच गाजवली असं म्हटलं जात आहे. कप दर्शनीय स्थळी ठेवत आशिष शेलार नेमकं काय सुचवू पाहत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.