ठाकुरनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं भाषण अर्ध्यातच आटोपलं. पश्चिम बंगालच्या ठाकुरनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. या गर्दीमुळे चेंगराचेंगरीही झाली, यामुळे काही महिला आणि मुलं जखमी झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. माटुआ समाजाच्या रॅलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी आले होते. मोदींचं भाषण ऐकण्यासाठी माटुआ समाजाचे लोक मैदानातून आतमध्ये यायचा प्रयत्न करत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जमलेल्या नागरिकांना शांत राहण्याचं आव्हान मोदींनी केलं, पण तरही त्यांच्याकडून पुढे येण्याचे प्रयत्न सुरु होते. यानंतर सगळ्यांना उभं राहता यावं, म्हणून सभेसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी स्टेजसमोर रिकाम्या असलेल्या जागेवर खुर्च्या फेकायला सुरुवात केली.


या सगळ्या गोंधळानंतर मोदींनी त्यांची सभा आटोपती घेतली आणि आपल्याला दुसऱ्या सभेला जायचं असल्याचं सांगितलं. सभेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर उपस्थितांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं.  याआधी मागच्यावर्षी १६ जुलैरोजी पश्चिम मिदनापूरमध्ये झालेल्या सभेवेळी स्टेज पडल्यामुळे काहीजण जखमी झाले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी


या सगळ्या प्रकारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे. ठाकूरनगरमधल्या माझ्या भाषणावेळी भरपूर उत्साह होता. भाषणासाठी असलेलं मैदान क्षमतेपेक्षा दुप्पट भरलं होतं. नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल मी त्यांची माफी मागतो, असं मोदी म्हणाले.



दरम्यान या सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. रॅलीमध्ये जमलेली गर्दी पाहून दीदी हिंसेच्या मार्गावर का जात आहेत, हे मला समजलं, असं वक्तव्य मोदींनी केलं. पश्चिम बंगालच्या जनतेचं आपल्याप्रती असणारं प्रेम पाहता आता याच प्रेमाला घाबरून लोकशाहीच्या बचावाच्या नावाखाली निर्दोषांच्या हत्या केल्या जात असल्याची टीका मोदींनी केली. 


नरेंद्र मोदींचा ममता दीदींवर निशाणा