'इनका जाना तय है', पंतप्रधान मोदींचं सूचक विधान

यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे 'सबका साथ सबका विकास'

Updated: Feb 2, 2019, 03:11 PM IST
'इनका जाना तय है', पंतप्रधान मोदींचं सूचक विधान title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, लोकसभा निवडणूकांपूर्वी त्यांनी ठाकूरनगर येथून निवडणूकीसाठीच्या तयारीला दणक्यात सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. मोदींची उपस्थिती असणाऱ्या या रॅलीत मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. ज्यामध्ये त्यांच्या भाषणाने सर्वांचं लक्ष वेधलं. अवघ्या काही मिनिटांच्याच भाषणामध्ये त्यांनी जनतेला शांतीचा मार्ग अवलंबण्यास सांगितलं. 

पश्चिम बंगाल दौऱ्यावर असणाऱ्या मोदींनी यावेळी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला. रॅलीमध्ये उपस्थित जनसंख्या पाहून मला समजतंय की, दीदी हिंसेच्या मार्गावर का जात आहेत, असं सूचक विधान त्यांनी केलं. पश्चिम बंगालच्या जनतेचं आपल्याप्रती असणारं प्रेम पाहता आता याच प्रेमाला घाबरून लोकशाहीच्या बचावाच्या नावाखाली निर्दोषांच्या हत्या केल्या जात असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. 

येत्या काळात आपण नागरिक संशोधन बिल आणणार असून तृणमूल काँग्रेसनेही त्याला पाठिंबा देत संसदेत एकमताने त्याला सहमती मिळावी, असंही स्पष्ट केलं. तर दुर्गापूर येथे त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या राजकीय धोरणावर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत 'इनका जाना तय है....' असं सूचक विधान केलं. 

पूर्ण अर्थसंकल्पानंतर बदलणार चित्र 

रॅलीमध्ये मोदींनी नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाविषयीसुद्धा विधान केलं. इतिहासात पहिल्याच वेळी यंदा अर्थसंकल्पात काही मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूकांनंतर जेव्हा पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येईल तेव्हा शेतकरी, तरुण पिढी आणि समाजाचं एकंदर चित्र बदललेलं असणार आहे, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं. 

शिवाय दुर्गापूर येथील रॅलीत त्यांनी सबका साथ सबका विकास या घोषवाक्याची उकल करत पीयुष गोयल यांनी जाहीर केलेला अर्थसंकल्प हे याचं उत्तम उदाहरण आहे, असंही ते म्हणाले. या अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्र आणि वर्गासाठी काही तरदूदी करण्यात आल्याचा संदर्भ त्यांनी 'सबका साथ सबका विकास'शी जोडला. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूकांच्या धर्तीवर देशभरात सध्या वातावरण चांगलच तापत असून, शक्य त्या सर्व परिंनी मतदारांवर प्रभाव पाडत सत्तास्थापनेसाठी सर्वच पक्ष आणि त्यातील नेतेमंडळी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे.